गेल्या काही दिवसांपासून वाहन चालकांत ई २० पेट्रोल म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून राग व्यक्त होत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकतरी पुरावा द्या, असे आव्हान दिलेले आहे. तसेच ही आपल्याविरोधात राबविली गेलेली पेड मोहिम असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परंतू, आता करोडो रुपये मोजून आणलेली फेरारी ई २० इंधनामुळे खराब झाल्याचा दावा एका ऑटो ब्लॉगरने केला आहे, तसेच गडकरी याची जबाबदारी घेतली का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
इथेनॉलवाल्या पेट्रोलमुळे वाहन मालक कमी मायलेज, जास्त मेटेनन्स येत असल्याचा दावा करत आहेत. ऑटो कंपन्यांनी देखील हे खरे असल्याचे म्हटले आहे. तर टोयोटा सारख्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीने आपल्या २०२२ पूर्वीच्या कारमध्ये इथेनॉलवाले पेट्रोल टाकू नका असे सांगितले आहे. परंतू, केंद्र सरकारने सर्वच पंपावरून साधे पेट्रोल हटविले असून आता सर्वत्र ई२० पेट्रोल त्याच दराने विकले जात आहे. शेतकऱ्यांदा फायदा होत असल्याचे सांगत केंद्र सरकारने ही सक्ती सुरु केली आहे. याविरोधात आता वाहन मालकांचा राग व्यक्त होऊ लागला आहे.
रतन ढिल्लन नावाच्या ऑटो ब्लॉगरने एक्स अकाऊंटवर फेरारी खराब झाल्याची पोस्ट केली आहे. तसेच नितीन गडकरी यांना टॅगही केले आहे. १७ सप्टेंबरला ही पोस्ट करण्यात आली असून गडकरी यांनी अद्याप यावर काही उत्तर दिलेले नाही. ढिल्लन यांनी त्यांच्या पेजवर E20 इंधन भरल्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या फेरारीचा फोटो शेअर केला आहे.
लाल फेरारी ब्रँडेड कव्हरने झाकलेली आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेली आहे. ही करोडो रुपयांची फेरारी वापरकर्त्याच्या एका मित्राची आहे. पोस्टमध्ये तो म्हणतोय, काही दिवसांपूर्वी कारमध्ये E20 पेट्रोल भरण्यात आले होते आणि आता ती सुरू होत नाहीय. फेरारी एका सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली. तंत्रज्ञ म्हणतात की नुकसान E20 इंधनामुळे झाले आहे. आता मला सांगा, गडकरी याची जबाबदारी घेतील का? गाडीवर करोडो रुपये खर्च करून, रोड टॅक्स, वाहन जीएसटी कर आणि इंधन कर भरल्यानंतर, भारतात तिप्पट रक्कम कार भरल्यानंतर त्यांना हेच मिळते, असा आरोप या व्यक्तीने केला आहे.