वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. कायदे व नियम यांचे पालन करताना ते नेमके कशा पद्धतीने अंमलात आणावेत, तेच अनेकांना नीटपणे कळत नाही. मस्तीत ड्रायव्हिंग करणारे जसे असतात तसेच अज्ञानातून वाहन चालन करणारे वा भीत भीत ड्रायव्हिंग करणारेही असतात. विशेष म्हणजे अशा सर्व प्रकारच्या वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचा विविध प्रकारे भंग होत असतो. शहरांमध्ये वा महामार्गावर रस्त्यांवर पांढरे पट्टे व रेषा आखलेल्या असतात. शहरी रस्त्यांवर एका बाजूने तीन वाहने जातील व दुसऱ्या बाजूने ही तीन वाहने जातील अशा रस्त्यांमध्ये तीन पदरी वाहतुकीसाठी वा दोन पदरीही वाहतुकीसाठी रेषा आखलेल्या असतात. वाहनांनी आपली रांग विनाकारण बदलू नये असे निर्देशही दिलेले असतात. मात्र ते अनेकांकडून पाळले जात नाहीत. उजव्या बाजूला जायचे असेल तर वाहन उजव्या बाजूला असलेल्या रांगेत ठेवले पाहिजे ही साधी बाबही अनेकांना समजत नाही वा समजून दुर्लक्ष केले जाते. यामुळे सिग्नलला आल्यानंतर अतिशय अयोग्य पद्धतीने उजव्या रांगेत घुसण्याचा प्रयत्न होणे, किंवा त्या उजव्या रांगेच्या बाजूच्या अंगाला असलेल्या रांगेत आणखी कोंडी करणे हे घडते. डाव्या बाजूला असलेल्या रांगेत असाल तर तुम्हाला सरळ जायचे असेल तर ठीक आहे पण डाव्या बाजूला जायचे असेल तर वाहन नेहमी डाव्या रांगेत ठेवायला हवे ही साधी बाब अनेकांकडून टाळली जाते.रांग मोडणे हा बहुधा भारतीय मानसिकतेचाच दोष मानला पाहिजे, वाहतुकीमध्ये मात्र असे नियम केवळ शिस्त म्हणून नव्हे, केवळ कायदा म्हणून नव्हे तर दुसऱ्या वाहनांची, पादचाऱ्यांची व स्वतःचीही सुरक्षा म्हणून पाळले गेलेच पाहिजेत. प्रत्येक वेळी वाहतुकीचे नियम कळत नाहीत असे होत नाहीत. तर हे नियम व विशेष करून रांगा मोडण्याचे कौशल्य दाखवण्याचे प्रकार सूज्ञ वाहनचालकाने आता बंद करायला हवे. वाढती वाहने, वाहतूक कोंडी यावर मार्ग काढणाऱ्या वाहतूक पोलिसांना त्यामुळे मदत होते आिण विनाकारण होणारी वाहतूक कोंडीही अनेकदा टाळता येते.
रस्त्यावर आखलेल्या रेषांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 17:00 IST
रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करायलाच हवे. रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचे महत्त्व व निर्देश हे लक्षात घेऊन त्यांचे पालन करायला हवे.
रस्त्यावर आखलेल्या रेषांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे
ठळक मुद्देडाव्या बाजूला जायचे असेल तर वाहन नेहमी डाव्या रांगेत ठेवायला हवे ही साधी बाब अनेकांकडून टाळली जाते.रांग मोडणे हा बहुधा भारतीय मानसिकतेचाच दोष मानला पाहिजे