लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना विभागाचे उपमुख्य कार्यकारी यासह अनेक महत्त्वाच्या विभागातील विभाग प्रमुखांचे पदे रिक्त आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर चालविला जात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी शासनाने काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला मराठवाड्यातील एका गटविकास अधिकाऱ्याची पदोन्नतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शासनाने पोस्टिंग केलेली आहे. मात्र हे साहेब अद्यापही जिल्हा परिषदेत रुजू झालेले नाहीत. त्यामुळे नवीन एचओडी रुजू होण्यापूर्वीच पोस्टिंगमध्ये अंशतः बदलासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकतर अधिकारी मिळेनात आणि दुसरीकडे प्रभारी अधिकाऱ्याशिवाय कामकाज चालेना अशी स्थिती झेडपीची झालेली आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध प्रकारची विकासात्मक कामे केली जातात. ही कामे करताना या स्थानिक स्वराज्य संस्थेत आज घडीला खातेप्रमुखाच्या रिक्त पदांचा दिवसेंदिवस अनुशेष वाढत चालला आहे. वर्षभरापूर्वीच सामान्य विभागाचे डेप्युटी सीईओंची बदल झाली. त्यापाठोपाठ रोजगार हमी योजना, स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांचीदेखील कोल्हापूर जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांचे बदलीवर इतर ठिकाणी आउट गोइंग झाले असले तरी या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागेवर नवीन कुठल्याही अधिकाऱ्यांची इनकमिंग झाले नाही. अशातच नुकत्याच विधानसभा निवडणुका आटोपल्या. यानंतर शासनाने गटविकास अधिकारी संवर्गातील काही अधिकाऱ्यांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती केली.
यामध्ये अनेक ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग केल्यात. परंतु नियुक्तीनंतर नव्याने जीएडीला येणारे अधिकारी आठवडा उलटूनही नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे नवीन येणारे अधिकारी रुजू होणार की सोयीच्या ठिकाणी नियुक्तीसाठी अंशतः बदल करून घेणार याची चर्चा झेडपीत रंगत आहेत.