पशूशल्य विभागाला आदेश : नोटीस बजावणार, घाण, दुर्गंधी पसरल्यास कारवाई अमरावती : महापालिकेची परवानगी न घेता रस्त्यावर कुठेही मांस कापणाऱ्या अन् विकणाऱ्यांवर लिखित आचारसंहितेचा बडगा उगारला जाणार आहे. विशेष करून मटणविक्रेत्यांसाठी ही आचारसंहिता बंधनकारक असेल.महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी याबाबत सहायक पशूशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांना निर्देश दिले असून याबाबत संबंधित मटणविक्रेत्यांना नोटीस जारी केल्या जातील. इतवारा व अन्य बाजारातील ठिकाणे वगळता मटणविक्रेत्यांनी रस्त्यांवरच दुकाने थाटली आहेत. पंचवटीकडून पुढे आरटीओकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तर या मटण विक्रेत्यांची मोठी रांगच आहे. सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून ही दुकानदारी थाटली असतानाच ते त्याचठिकाणी पशुंची कत्तल करीत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मटणविक्री केल्यावर विक्रेते वाया गेलेले मांस व अन्य वेस्टेज तेथेच टाकून जात असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांची पुरती पंचाईत झाली आहे. या दुर्गंधी आणि अव्यवस्थेबाबत त्यांना हटकले असता ते मुजोरी करतात. या पार्श्वभूमिवर या मटण विक्रेत्यांनी नियमात राहून कसा व्यवसाय करावा, याचे धडे महापालिका त्यांना देणार आहे. या मटणविक्रेत्यांना ज्या ठिकाणी ते मटण विकतात त्या ठिकाणी कत्तल करता येणार नाही, असे निर्देश नव्या नियमावलीतून दिले जाणार आहेत. जनविकासच्या नगरसेविका सुजाता झाडे यांनी ही समस्या आयुक्तांच्या कानावर घातल्यानंतर नव्या नियमावलीचे निर्देश पशूशल्य विभागाला मिळाले आहेत. (प्रतिनिधी)केवळ विक्रीएक मोठे काऊंटर ठेवून त्याच्या आत मटण विक्रेत्यांनी वजनाप्रमाणे मटणाच्या थैल्या ठेवाव्यात आणि त्या जागेवर ग्राहकाला केवळ मोजून द्याव्यात, घरुनच अर्धा किलो, एक किलो, दोन किलो प्रमाणे वजननिहाय थैल्या बनवून आणाव्यात. रस्त्याच्या शेजारी त्या विक्रेत्याला मांस कापता येणार नाही. स्वच्छता राखण्याची संपूर्ण जबाबदारी त्याची स्वत:ची असेल. ठराविक कालावधीतच मटणविक्री करता येईल, असे निकष ठरवून देण्यात येणार आहेत.
मांस विक्रेत्यांसाठी लिखित आचारसंहिता !
By admin | Updated: September 1, 2016 00:20 IST