अमरावती : प्रयास संस्था, रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊन आणि सावी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व २७ मार्च रोजी अंधांसाठी विदर्भातील पहिली दोन दिवसीय निवासी कार्यशाळा अमरावती येथे पार पडली. या कार्यशाळेला विदर्भातील गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, अकोला व अमरावती जिल्ह्यातील ११० स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.
दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या अंधांना इतरांवर चे अवलंबन कमी करून त्यांचे रोजचे जगणे स्वावलंबी कसे बनेल, यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. पांढऱ्या काठीचा शास्त्रशुद्ध वापर कसा करायचा, या काठीच्या साहाय्याने कुणाचीही मदत न घेता चालायचे कसे, हे अंधांना प्रत्यक्ष शिकविण्यात आले.
फरशी स्टॉप येथील प्रयास सेवांकुर भवनात आयोजित कार्यशाळेमध्ये पहिल्यांदा हॉलमध्येच अगदी काठी कशी धरायची, पावले व काठी यांचा क्रम कसा असावा, याचे वैयक्तिकरीत्या प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात परिसरात व त्यानंतर संपूर्ण कॉलनीमध्ये रस्त्याने चालण्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. यामुळे सहभागी दिव्यांग त्यांचा आत्मविश्वास बळावला.
जिन्याने चढणे, लिफ्टचा वापर, स्पर्शज्ञानातून विविध नोटा, भाज्या, धान्य ओळखणे यांचे प्रात्यक्षिक पार पडले. सावी फाऊंडेशनच्या तेजस्विनी भालेकर यांनी स्मार्टफोन आणि त्यातील निरनिराळ्या उपयुक्त अॅप्स वापराचे प्रशिक्षण दिले. दिशाज्ञान, कानावर पडणाºया आवाजावरून पंख सुरू आहे की बंद, त्यावरून खोलीची अंतर्गत रचनेचा अंदाज बांधणे, स्मरणशक्तीसाठी काही खेळ आदी उपक्रम यावेळी झाले. सहभागींना गाणी ओळख व प्रतिक्रिया यामधून व्यक्त होण्याची संधी मिळाली. याच कार्यक्रमात जिल्हा निवडणूक विभागातर्फे लोकसभेसाठी मतदान करताना दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा व मतदानाच्या पद्धती विषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुंबईचे स्वागत थोरात व त्यांच्या चमूने कार्यशाळेचे संचालन केले. त्यांनी विकसित केलेल्या प्रशिक्षण पद्धतीनुसार ही कार्यशाळा पार पडली. अंधांना आपले आयुष्य सुलभतेने जगता यावे, यासाठी गेली पंचवीस वर्षे ते कार्य करीत आहेत. कार्यशाळेत २६ मार्चला सायंकाळी १०.३० वाजता चला डोळस होऊया, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये थोरात यांनी १९९३ पासून सुरू केलेल्या आपल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांचे ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ हे ८८ अंधक कलावंतांना घेऊन दिग्दर्शित केलेले नाटक विश्वविक्रमी ठरले आहे.
अमरावती रोटरी अध्यक्ष डॉक्टर सुशील सिकची, प्रयास संचालक डॉ. अविनाश सावजी, जहीर नाईक, श्याम राजपूत, रवींद्र यादव यांच्यासह कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले.