अमरावती/ संदीप मानकर
कोरोना काळात सतत लॉकडाऊन व कोरोनाचे संकट असतानाही गत सव्वा वर्षापासून सतत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमध्ये महिला अधिकारी व कर्मचारीसुद्धा पुरुषांच्या बरोबरीने कर्तव्य बजावत आहेत. परंतु, पुरुष अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या तुलनेत महिलांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागत आहेत. त्यातून स्वत:ला सावरत घरची जबाबदारी आणि कर्तव्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्या त्या अमरावतीतील वर्दीतल्या रणरागिणी आहेत.
राज्यात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव हा अमरावतीत होता. अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाला तो नियंत्रणात आणण्याकरिता कस लागला. काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या कामात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषत: महिला पोलिसांनी या दिवसात घर व मुले सांभाळून आपले कर्तव्य पार पाडले. परंतु, कर्तव्य पार पाडत असताना त्यांना आपल्या मुलांकडेही लक्ष देता आले नाही. कठोर मन करून त्यांना रात्र-अहोरात्र कर्तव्यावर जावे लागले. अमरावती शहरात १० पोलीस ठाणे, तर ग्रामीणमध्ये ३१ पोलीस ठाणे आहेत. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात हजार पेक्षा जास्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी विनाकारण नागरिकांनी घराबाहेर फिरू नये, याकरिता विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाते, तशी मोहीम राबविली जाते. त्यात महिला अधिकारी व कर्मचारी तितक्याच जबाबदारीने कर्तव्य निभावत आहेत. विशेष म्हणजे बहुतेक महिला पोलीस मुला-बाळांच्या संगोपनासह रोजची घरची कामे पार पाडून कर्तव्यावर हजर राहत आहेत. यात त्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी मुलांकडून होणारे हट्ट इच्छा नसतानाही डावलावे लागतात. कधी रुसलेल्या मुला-मुलींची नाराजी बंदोबस्त बघता-बघता फोनवरूनच दूर करावी लागते. कोरोनाने थैमान घातल्यापासून आपल्यामुळे आपल्या मुलांना कोरोना तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागत आहेत. कित्येक मातांनी या दिवसात मुलांना प्रेमाने घट्ट मिठीदेखील मारलेली नाही. गत अनेक पोलीस मातांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाडक्या मुलांना दूर ठेवल्याच्या भावना अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविल्या. त्यात सर्वाधिक हाल हे ३ ते ५ वर्षांखालील मुलांचे व त्यांच्या मातांचे होत आहेत.
शहरातील एकूण पोलीस- १८७८
एकूण महिला पोलीस अधिकारी-
एकूण महिला पोलीस कर्मचारी -
महिला पोलिसांना काय वाटते?
कोट
पोलीस स्टेशनला काम करीत असताना तक्रारदारांशी, आरोपींशी संपर्क येतो. त्यामुळे आपल्याला कोरोना तर होणार नाही ना, याची भीती वाटते. घरी गेल्यानंतर सुद्धा कोरोनापूर्वी जसे नॉर्मल जगणे होते, ते राहले नाही. मुलांच्या शिक्षणाकडे पण दुर्लक्ष होते.
लता उईक (भलावी)
महिला पोलीस नाईक गाडगेनगर
कोट
अनेकदा १२ तासांपेक्षा जास्त रात्रकालीन ड्युटी करावी लागते. मला अडीच वर्षांची मुलगी आहे. जेव्हा मला कोरोना झाला, तेव्हा तिच्यापासून पंधरा दिवस दूर राहिले. होमआयसोलेट असताना ती रडत असतानाही तिच्या जवळ जाऊ शकत नव्हते. मनाला खूप वेदना झाल्या. आजही घरी गेल्यानंतर अंघोळ केल्यानंतर तासभर तरी मुलीला जवळ घेत नाही. घरी त्यामुळे हा काळ फार वेदनादायी ठरत आहे.
ज्योती बडेगावे
पोलीस उपनिरीक्षक, नागपुरीगेट
कोट
कोरोना काळात कुटुंब व कर्तव्य सांभाळताना खूप ताण वाढला होता. कर्तव्य झाल्यानंतर घरी पटकन वावरता येत नव्हते. आपल्यामुळे मुलांना तर कोरोना होणार नाही ना, याचे सतत दडपण होते. अनेकदा मनात व्हीआरएस घ्यावी असे वाटले; पण नोकरीचा तेवढा कालावधीही पूर्ण झाला नाही.
वैशाली सुरजेकर
महिला पोलीस नाईक फ्रेजरपुरा ठाणे
पोलिसांची मुले काय म्हणतात
कोट
आई जेव्हा ड्युटीवर जाते, तेव्हा सतत मनात भीती राहते. आईला काही नाही झाले पाहिजे हीच कल्पना मनात राहते. पूर्वीसारखा वेळसुद्धा या काळात आई देऊ शकत नाही. लवकर या कोरोनाच्या संकटावर मात होवो हीच प्रार्थना नेहमी करतो.
राज भलावी, अमरावती
कोट
आईने कर्तव्य बजाविताना स्वत:ची काळजी घ्यावी याचाच विचार मनात असायचा. आई पॉझिटिव्ह तर होणार नाही ना याची काळजी वाटायची. आता कोरोना लसीकरण झाल्याने थोडी चिंता कमी झाली आहे. तरीही नाकाबंदी पाॅईंट व इतर ठिकाणी ड्युटी लागत असल्याने काळजी वाटते.
शशांक सुरजेकर
सुरक्षा कॉलनी
बॉक्स :
कुटुंबाची काळजी मोबाईलवरून
२४ तास टप्प्याटप्प्याने महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यावर हजर राहावे लागते. त्यामुळे रात्री उशिरा गेले तर मुले झोपलेली असतात. तर दिवसभरसुद्धा कुणी बंदोबस्तावर, तर कुणी तपासाच्या माध्यमातून कर्तव्यावर राहतात. त्यामुळे मुलांशी संपर्क हा फक्त मोबाईलवरून होताे. वरिष्ठ समोर असतील तर अनेकदा मुलांचा फोन आल्यानंतरही त्यांना होल्टवर ठेवण्याची वेळ येते. आधी महिला पोलीस वेळ काढून घरी जात होत्या. मात्र, कोरोना काळात त्या कर्तव्य संपल्याशिवाय घरी जाणेसुद्धा टाळत आहेत.