अमरावती : सेवानिवृत्त झाल्यानंतर मी कोणतेही शासकीय पद स्वीकारणार नाही. मात्र, सेवानिवृत्तीनंतर दारापूर, अमरावती आणि नागपूर येथे सर्वाधिक वेळ घालवेल, असे मोठे विधान देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी येथे अमरावती जिल्ह्यातील दारापूर या मूळ गावी त्यांनी हृद्य सत्कार सोहळ्याप्रसंगी केले.
सरन्यायाधीश गवई हे गत दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते दारापूर येथे त्यांचे वडील रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी हजर झाले असता त्यांचा गावकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, न्या. भूषण गवई यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड, केम्ब्रीज असे नावाजलेले विद्यापीठ असो वा लंडन ऑफ इकॉनाॅमी, ग्रेजईन असो अशा अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचे विचार मांडण्याची, राज्य घटनेच्या योगदानाबद्दल बोलण्याची संधी मिळाली. मी दारापूरचा सुपुत्र असल्याचा हा माझ्यासाठी अभिमान आहे. गावकऱ्यांचे प्रेम आहेच, ते असेच वृद्धिंगत व्हावे. हृद्य सत्कार केल्याबद्दल मी आभार मानणार नाही, पण मनापासून तुमच्या ऋणदायित्वातून मुक्त होऊ इच्छित नाही. सेवानिवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर येथे घालवेल. अमरावती, नागपूर येथे अधिक काळ राहील. भविष्यात तुमच्यासोबत संवाद साधता येईल. वेळ घालवता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी सरन्यायाधीश यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई, खासदार बळवंत वानखडे, आमदार रवी राणा, आमदार गजानन लवटे, दारापूरच्या सरपंच काजल धंदर, डॉ. तेजस्विनी गवई, ज्योतिरादित्य गवई, डॉ. राजेंद्र गवई, वसंतराव गवई, रूपचंद खंडेलवाल, सुधाकर भारसाकडे, बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.