वाघाच्या हालचालींचे मॉनिटरिंग : ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहनवैभव बाबरेकर अमरावतीवडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वाघाचा मुक्तसंचारामुळे वनविभागाने ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाद्वारे वाघाच्या हालचालींचे मॉनिटरिंग केले जात असून वन्यप्रेमींनीही जंगलभ्रमंतीच्या माध्यमातून वाघांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पोहरा-चिरोडीच्या जंगलात आढळलेल्या वाघाची छायाचित्रे वनविभागाच्या टॅ्रप कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तेव्हापासून वाघांचे मॉनिटरिंग सुरु झाले असून ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तो वाघ कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी वनविभाग प्रयत्नरत असून वनविभागाने वाघांची छायाचित्रे अन्य कार्यालयांकडे पृष्ठीकरिता पाठविले आहे. दरम्यान वनसूत्रांनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीवरून तोे वाघ बोर अभयारण्यातून आल्याची शक्यता वर्तविली गेली. बोरमधील कॅटरीना वाघीणींचे चारही छावे हे तिच्यापासून लांब गेले आहेत. त्यापैकी दोन ते अडीच वर्षांचे दोन छावे जिल्ह्यालगतच्या जंगलात मुक्त संचार करीत असल्याचे संकेत आहेत. वाघांच्या मुक्त संचारामुळे वनकर्मचाऱ्यांनी जंगलात गस्त वाढविली आहे. तसेच जंगल मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना जगंलात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना वाघाबद्दल सूचना देऊन सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देत आहे. चप्प्याचप्प्यावर वनकर्मचारी तैनात असून ते जंगलात जाणाऱ्यांकडे लक्ष ठेवूनच आहे. त्यामुळे जंगल भागात आता वनविभागाने अलर्ट जारी केल्याचे चित्र दिसून येत आहे.जंगलातील पार्ट्यांवर ‘वॉच’निसर्गरम्य वातावरणात पिकनिकसह मद्यपार्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक जण जातात. मात्र, वाघाचे अस्तित्व सिद्ध झाल्यापासून वनविभागाने जंगलातील पार्ट्यांवर लक्ष केंद्र केले आहे. जंगलात एखाद्या ठिकाणी कोणी पिकनिक करीत असेल, तर त्यांना तत्काळ तेथून बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अमरावती-चांदूररेल्वे मार्गावरची वर्दळ कमीअमरावती-चांदूररेल्वे मार्गावर पोहरा-चिरोडी जंगल असून या मार्गावरून एरवी सतत वर्दळ सुरू असते. मात्र, जंगलात वाघाचा मुक्त संचार असल्याचे निदर्शनास आल्यापासून यामार्गावरील वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे. वाघाच्या भीतीमुळे अनेकांनी ये-जा करण्याचा मार्ग बदलविला असून वाहनधारक सायंकाळनंतर त्या मार्गाने जाणे टाळत आहे. त्यामुळे सायंकाळनंतर वर्दळ रोडावत असल्याने या मार्गावर शुकशुकाट जाणवत आहे. पोहरा-चिरोडीतील वाघाच्या हालचालींचे मॉनिटरिंग सुरु असून काही भागात वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे जंगलाशेजारच्या वस्तीतील नागरिकांनी सावधगिरी बाळगायला हवी. - हेमंतकुमार मिना, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग
वनविभागासह वन्यप्रेंमींची पोहरा-चिरोडी जंगलभ्रमंती
By admin | Updated: January 9, 2017 00:01 IST