लोकमत प्रासंगिक
चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झाली. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या सर्वत्र वारंवार अनुभवल्या गेलेल्या म्हणीची पुन्हा एकदा सिद्धता झाली. दिल्लीला जातानाच पदभार हस्तांतरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करून ठेवल्यामुळे गुडेवारांना अमरावतीत न येताच पदमुक्तही होता आले. मॅटमध्ये अपिल करणे, मुख्यमंत्र्यांना विनंती करणे, असे पर्याय उपलब्ध असताना पदाचा जराही मोह न बाळगणारा, तत्क्षण पदमुक्त होणारा हा अधिकारी जातानाही आगळा भासला.'टॉक आॅफ दी टाऊन' ठरण्याची योग्यता अत्यल्प अधिकाऱ्यांत अनुभवता आली आहे. गुडेवारांमध्ये ती होती. प्रसिद्धी माध्यमांत त्यांना मिळणारी जागा बघून राजकीय मंडळींसह उच्चश्रेणी अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावत असे. 'न्यूज व्हॅल्यू' (बातमीमुल्य) असलेल्या अनेक बाबी गुडेवारांच्या दैनंदिन कार्यप्रणालीत अलगद घडत होत्या. गुडेवार त्यामुळेच अमरावतीत सर्वाधिक प्रसिद्धी मिळू शकलेले अधिकारी ठरले. गुडेवारांना मिळणारी प्रसिद्धी केवळ श्वेत होती, असे नाहीच मुळी. ते कायम दुअर्थी चर्चेत राहिलेत. पटले त्यांनी स्तुती केली, खटकले त्यांनी आरोप केलेत. कुणाला त्यांच्यात उपयोगिता मूल्य जाणवले तर कुणाला उपद्रव मूल्य. गुडेवारांच्या एकाच कार्यपद्धतीचे असे दोन भिन्न परिणाम अमरावतीतील लोक, राजकारणी, समाजकारणी आणि कर्मचारी अनुभवत होते. तीन दशकांपूर्वी रजनीश ओशो नावाच्या आध्यात्मिक गुरुच्या वक्तव्यांमुळे, तत्त्वज्ञानामुळे देशात उठलेले वादळ असेच मिश्र चर्चांचे होते. गुडेवारांच्या आगमनाने, वास्तव्याने आणि जाण्याने जे वादळ अमरावतीत घोंगावत राहिले ते अनुभवताना रजनिशांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण चमकून जाते. का झाली बदली?गुडेवारांच्या बदलीच्या फाईलीवर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची वार्ता अमरावतीत गुरुवारी धडकली. जनसामान्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शासनाने त्याचा कानोसा घेतल्यानंतर गुडेवारांच्या बदलीचे आदेश येण्याचे थांबले. शुक्रवारी लोकांदोलनाचा रेटा बघून बदली प्रक्रिया निद्रावस्थेतच राहिली. बदली रद्द होणार असल्याची ती प्रथम पायरी होती. शनिवारी 'शहर बंद' पुकारले गेले. त्या बंदमध्ये सहभागी होऊन कुठल्याशा 'टिपू सुल्तान ग्रुप'ने शहरातील अनेक बाजारपेठांत हिंसक धडक दिली. काही महिन्यांपूर्र्वी जेथे खून झाला त्या मराठा सावजी हॉटेलवर त्यांनी बदल्याच्या भावनेतून हल्ला केला. हा विध्वंसक ग्रुप शहरभर तोडफोड, मारामारी, फेकाफेकी करीत दहशत निर्माण करीत सुटला होता. राजकमल चौकातील आंदोलनाच्या मंचावरून समर्थन घोषित करणारा हा ग्रुप जे काही करीत होता त्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी अर्थात्च आयोजकांच्या शिरावर आली. आयोजकांनी उभारलेले आंदोलन पोलीस परवानगी घेऊन उभारलेले नव्हते. त्यामुळे कायदेशीररीत्या मूळत: ते अवैध होतेच; पण पोलिसांनी त्याचा बाऊ केला नव्हता. 'टिपू सुल्तान ग्रुप'ने धुडगूस घातल्यानंतर पोलीस जागे झाले. त्या ग्रुपचा उच्छाद 'सोशल मीडिया'वर व्हायरल झाला. मुद्दा कधीही, कुठेही उपस्थित होऊ शकणार होता. पोलीस गोत्यात येऊ शकणार होते. पोलिसांनी तमाम आंदोलकांविरुद्ध दंगल माजविण्याचे गुन्हे नोंदविले. गुडेवार समर्थकांसाठी हे सारे अनपेक्षित आणि आकसपूर्ण वाटणारे होते. शिरस्त्यानुसार शानाला आंदोलनाचा जो अहवाल पाठविला गेला त्यात या साऱ्या उच्छादाची चर्चा होती. बंद स्वयंस्फूर्त नव्हता, तो दहशतीच्या सावटाखाली घडवून आणला गेला, ही प्रतिमा निर्माण झाली. त्याचा परिणाम अवरुद्ध झालेल्या बदली आदेशावर झाला. गुडेवारांच्या बदलीचे आदेश जारी झाले.