लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साक्षगंध झाल्यानंतर एका तरुणीवर नियोजित वराने शारीरिक बळजबरी केली. मात्र, त्यानंतर वागदत वधूची फसवणूक करत त्याने दुसऱ्याच मुलीशी मेतकूट जुळविले. येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. येवदा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी विक्कीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, २० वर्षीय फिर्यादी व आरोपी यांच्यात प्रेम संबंध होते. दोघांच्याही कुटुंबाच्या सहमतीने मे २०२५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. आरोपीने १२ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादीला मॅसेज करून तिला अंगणात भेटायला बोलावले. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक बळजबरी केली. त्यानंतर ते १९ ऑगस्ट रोजी शेगाव येथे फिरण्यास गेले. तेथेदेखील आरोपीने बळजबरी केली. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी विक्की हा तरुणीच्या घरी डबा घेण्याकरिता आला. ती चहा करण्याकरिता घरात गेली. परत आली असता तो फोनमध्ये मग्न दिसला.
स्वतःचा मोबाइल फोडला
आरोपी हा परक्या मुलीसोबत बोलत असावा, म्हणूनच त्याने त्याचा मोबाइल फोडला, असे फिर्यादीला वाटले. घडलेला प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला. त्यावर तिचे आई - वडील आरोपीच्या घरी गेले. त्यावर काहीही ऐकून न घेता तू माझ्या मुलावर आरोप करीत आहेस, आळ आणत आहेस, असे त्याच्या कुटुंबीयांनी तिला बजावले. शिविगाळ करत घरातून निघून जा, अन्यथा जिवाने मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडिताने १६ सप्टेंबर रोजी येवदा पोलिस ठाणे गाठले.