अमरावती : विभागात सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. पांढरी माशी ही सोयाबीनवरील ‘पिवळा मोझॅक’ या विषाणूजन्य रोगाची वाहक असल्यामुळे सोयाबीन पिकावर अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पिवळा मोझॅक रोगाची लागण झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्रात सोयाबीन लागवडी खालील भागात हा रोग कमी अधिक प्रमाणात आढळून येतो. मात्र या खरीप हंगामात हा रोग व्दिदलवर्गीय पिकांवर झपाट्याने पसरत असल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे नियमित निरीक्षण करुन या रोगाची वाहक असलेल्या पांढऱ्या माशीचे त्वरित व्यवस्थापन करुन नुकसान टाळणे गरजेचे आहे. सोयाबीन पिवळा मोझॅकलक्षणे : रोगट झाडाच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पानांमधील हरितद्रव्ये नाहीसे झाल्याने अन्न निर्मितीमध्ये बाधा उत्पन्न होऊन उत्पादनात प्रचंड घट येते. हिरवे-पिवळे पाने असलेले झाड दूर नजरेवरुन ओळखता येते.प्रसार : हा रोग मुगबीन येलो मोझॅक विषाणुमुळे होतो. या विषाणुची वाहक पांढरी माशी आहे. तसेच उबदार तापमान, पांढऱ्या माशीची अती वाढलेली संख्या, दाट पेरणी, अत्याधिक नत्राचा वापर, तण या बाबींमुळेसुध्दा या रोगाची वाढ होण्यास मदत होते.
सोयाबीनवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: August 26, 2014 23:02 IST