अचलपूर : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या अचलपुरातील रस्त्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, याकडे सर्व जण टक लावून बसले आहेत. नगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था टुकार झाली आहे. जागोजागी खड्डे आहेत. स्थानिक प्रशासन मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
अचलपूर शहरात एकूण ५२ मोहल्ले, २३ नगरसेवक व जवळपास एक लाख लोकवस्तीचे ऐतिहासिक शहर आहे. दोन नद्या असलेल्या अचलपुरात नगर परिषदेचा व्यास १३ किलो मीटरचा आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक अचलपुरात हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. प्रमुख बाजारपेठ असलेल्या अचलपुरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. देवडी, चावलमंडी, माळवेशपुरा, जीवनपुरा, विलायतपुरा, हिरापुरा, सुलतानपुरा, गांधीपूल, सवईपुरा, अब्बासपुरा, मेहराबपुरा, सरायपुरा, बिलनपुरा, बेगमपुरा, बुद्धेखाँ चौक, दिलदारापुरा, दुल्हागेट या भागांतील मुख्य रस्त्यांची अशरक्ष: चाळण झालेली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे एकही पाणी आल्यावर रस्त्यावरच गटारगंगा साचते. वाहनांना जाण्या-येण्यासाठी नागरिकांना तारेवारची कसरत करावी लागते. अनेक वर्षांपासून नागरिक चांगल्या रस्त्याची वाट पाहत आहेत.