वडाळी तलाव गाळमुक्त केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:29 AM2018-04-26T01:29:48+5:302018-04-26T01:29:48+5:30

शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे.

When the Wadali Lake freeze? | वडाळी तलाव गाळमुक्त केव्हा?

वडाळी तलाव गाळमुक्त केव्हा?

Next
ठळक मुद्देजलस्तर कमी, मृतसाठा वाढतोय : महापालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष

इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे. मात्र, तलावाची खोली गाळाने भरल्यामुळे मृतसाठाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरात हा तलाव कोरडा पडण्याचे संकेत मिळू लागले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात उमरावती नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहराला याच वडाळी तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. हा ऐतिहासिक तलाव असून, याला 'सपोर्ट' म्हणून त्याचेही वर दोन तलावांची ब्रिटिश शासनाने निर्मिती केली होती. त्यामुळे वडाळी तलावावर तळ गाठण्याची वेळ कधीच आली नव्हती. ब्रिटिशांनी या तलावाची निर्मिती तंत्रशुद्ध पद्धतीने केली असून, शहराला पाणीपुरवठा ‘ग्रेव्हीटी’ पद्धतीने होत होता. मात्र, वाढती लोकसंख्या व शहरीकरणाचा व्याप पाहता तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात सिंभोरा धरणाची निर्मिती झाली. तेव्हापासून या तलावाचा होणारा पाणीपुरवठा थांबला. परंतु सद्यस्थितीत या तलावाच्या भरवशावर दोन पर्यटन स्थळे निर्माण करण्यात आली आहेत. वडाळी गार्ड व बांबू गार्डन अशी या प्रसिद्ध पर्यटन स्थळांनी नावे होत. अमरावतीकरांना शिण घालवण्यासाठी वा मनमोकळेपणाने पक्ष्यांचा मनाला आनंद देणारा आवाज ऐकण्यासाठी हे पूरक असून, येथे विद्यार्थ्यांसह वृद्धांची मोठी आवक असते. परंतु, ज्या तलावाच्या पाण्यावर हे पर्यटन स्थळ फुलले तेथे पाणीच शिल्लक राहणार नसेल तर येथील हिरवळ कशी बरी जिवंत राहील, असा सवाल आता नागरिकांना सतावत आहे. या समस्येवर मात करणे तेव्हाच शक्य होईल, जोपर्यंत तलावातील गाळ व वनस्पती काढली जाणार नाही, हे वास्तव आहे. या तलावाचे खोलीकरण याच महिन्यात केल्यास ते सोयीचे तर होणार असून, यापुढेही पाण्याची तमतरता भासणार नाही. यासंदर्भात महापालिकेचे शहर अभियंता जीवन सदार यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
ब्रिटिशकालीन चिमणी बंदावस्थेत
वडाळी तलाव हे शहरालगतच असून, त्यातील पाणी शहराच्या मध्यभागातून जाणाºया अंबानाल्यातून वाहते. त्यामुळे तलाव फुटल्यास शहराला धोका संभवतो. याबाबत सतर्कता म्हणून ब्रिटिश शासनाने तंत्रशुद्ध पद्धतीने त्याची निर्मिती केलेली आहे. जेव्हा पाण्याची पातळी वाढेल तेव्हा तेथे बसविलेल्या लोखंडी खांबावरील चिमणीतून पाण्याची धार वाहायला लागायची. अशा वेळी तलावाने धोक्याची पातळी गाठल्याचे लक्षात यायचे. त्यामुळे नालाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जायचा. मात्र, ती चिमणी कित्येक वर्षांपासून बंदावस्थेत असताना महापालिका उद्यान विभाग याकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

हा तलाव दोन्ही पर्यटन स्थळांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या महिन्यात गाळ काढणे शक्य आहे. पुढे धोकादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अशोक बुंधे,
व्यवस्थापक, वडाळी गार्डन

सदर कार्य शहर अभियंता व बांधकाम विभागांतर्गत येत असून, वडाळी गार्डन बीओटी तत्त्वावर दिलेले आहे.
- प्रमोद येवतीकर,
उद्यान अधीक्षक, महापालिका

Web Title: When the Wadali Lake freeze?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.