फोटो - २५एएमपीएच०२ - वझ्झर येथील बालगृहात शंकरबाबांच्या मुलांमध्ये रमलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर.
वझ्झर येथील बालगृहाला आकस्मिक भेट: गतिमंद, अंध मुलांमध्ये रमल्या जिल्हाधिकारी
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक जिल्हाधिकारी पवनीत कौर वझ्झर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद बाल सुधारगृहात पोहोचल्या. शंकरबाबांची भेट घेतली. मुलांप्रति बाबांचे समर्पण पाहून त्यांचेही डोळे पाणावले. तब्बल दोन तास त्या तेथे रमल्या. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी संगीत विशारदच्या सातव्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गांधारीचे खुद्द पवनीत कौर यांनी औक्षण करून कौतुक केले.
देशभरातील बसस्थानक, मंदिर, उकीरड्यावर, कुठे रस्त्यावर टाकून दिलेल्या गतिमंद, अंध, अपंग चिमुकल्यांना आणून त्यांचे अचलपूर तालुक्यातील परतवाडा ते धारणी मार्गावर वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य बालसुधारगृहात पालन-पोषण करणारे शंकरबाबा पापळकर यांच्या येथील २४ मुलांचे अमरावती, नागपूर, औरंगाबाद, शेगाव, अकोला अशा ठिकाणी विवाह झाले. १२३ मुले आजही त्यांच्याजवळ आहेत. शंकरबाबा अनाथांचे नाथ झाले . १७ मुलं फिटसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. जिल्हा रुग्णालयातून त्यांना औषधोपचार केला जातो. शंकरबाबांची चिमुकल्यांसाठी सुरू असलेली तळमळ पाहून जिल्हाधिकारीही थबकल्या. १८ वर्षांवरील दिव्यांग मुलांचा सांभाळ करण्यासाठी कायदा कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचा दिलासाही त्यांनी दिला. येथील रोपवनाची त्यांनी प्रशंसा केली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, संस्थेचे शिक्षक अनिल पिहुलकर आदी उपस्थित होते.
-----------------
आपकी नजरों ने समझा प्यार के...
जिल्हाधिकाऱ्यांनी औक्षण केलेल्या गांधारीने याप्रसंगी ‘आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे’ हे गीत सुमधुर सुरात गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दोन दिवसांपूर्वीच मुंबई येथील गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद परीक्षा गांधारीने उत्तीर्ण केली.
-------------------
अचानक भेटीचा योग आला. शंकरबाबांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांची कायद्याबाबत दृष्टी योग्य आहे. कारण माझ्यानंतर पुढे काय, ही बाबांची रुखरुख त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसते.
- पवनीत कौर, जिल्हाधिकारी, अमरावती
----------------
१८ वर्षांवरील मुलांचा सांभाळ करण्याबाबत कायदा व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून आपली लढाई सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. मुलांचे कौतुक केले. दोन तास त्यांनी तेथे मुलांसह घालविले.
- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, वझ्झर, ता. अचलपूर