अमरावती/ संदीप मानकर
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक उघड्यावरील खाद्यपदार्थांवर ताव मारतात. परंतु पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे हे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. त्यामुळे पोटाचे विकार व इतर आजार होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले असून उघड्यावरील खाद्यपदार्थ खाताना जरा जपून, असे म्हणायची वेळ आली आहे.
शहरात शेकडो हॉटेल आहेत. मात्र, मुख्य चौकात बहुतांश खाद्यपदार्थांचा किरकोळ व्यवसाय हातगाड्यांवरच केला जातो. गरम तथा चटपटीत खाद्यपदार्थांवर रस्त्यावरील धूळ उडते. त्यावर कुठलीही जाळी टाकण्यात येत नसल्यामुळे माशा बसून अन्नपदार्थ दूषित करतात. ते पदार्थ नागरिकांच्या पोटात गेल्यानंतर मळमळ, अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ (ए), जंत संसर्ग, टायफाईट व इतर पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.
बॉक्स:
ही घ्या काळजी
उघड्यावरच खाद्यपदार्थ खाण्यास टाळा. तेथील कॅनचे पाणीसुद्धा खात्री करून प्यावे. ज्या ठिकाणी काचेची रॅकमध्ये सुरक्षित ठेवलेले अन्न पदार्थच सेवन करा. शक्यतोवर हॉटेलमधीलच अन्न पदार्थ सेवन करा.
बॉक्स:
एफडीएचा असायला हवा ‘वॉच‘
उघड्यावर तयार केले जाणाऱ्या खाद्यपदार्थात तेलाचा वारंवार वापर केला जातो. अशा तेलात तळलेले पदार्थ शरीरासाठी हानीकारक ठरते. अनेक ठिकाणी भेसळयुक्त कमी दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री केली जाते. अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार कमी दर्जाच्या पदार्थांची विक्री केली जात असेल तर अन्न व प्रशासन विभागाने अशा पदार्थांचे नमुने घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे.
कोट
उघड्यावरील अन्न सतत खाल्ल्याने आतड्यांचा विकार होऊ शकतो. अतिसार, ए टाईपचा कावीळ, टायफाईड व अस्वच्छ पाण्याचा वापर केल्याने जंत संसर्ग होऊ शकतो. म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ टाळावे.
- डॉ. अतुल यादगिरे, कर्करोगतज्ज्ञ