Water of Upper Wardha dam in Tivasa taluka | तिवसा तालुक्यात अप्पर वर्धा धरणाचे पाणी दाखल
तिवसा तालुक्यात अप्पर वर्धा धरणाचे पाणी दाखल

ठळक मुद्देआजपासून नियमित टँकर : नागरिकांसह जनावरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : वर्धा नदीपात्र आटल्याने तिवसा शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी दुपारी ३ वाजतापासून अप्पर वर्धा धरणातून पाच तास पाणी सोडण्यात आले. रात्री ८ वाजता धरणाचे गेट बंद करण्यात आले. ते पाणी बुधवारी सकाळी ९ वाजता ३७ तासांनंतर तिवसा तालुक्यातील जावरा नदीपात्रात पोहोचले.
तिवसा, गुरुदेवनगर, भारवाडी यासह तालुक्यांतील अर्ध्या गावांना वर्धा नदीपात्रातून पाणीपुरवठा होतो. मात्र, यंदा ही नदी आटली आहे. त्यामुळे तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. वर्धा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी सोमवारी आंदोलन केले होते. त्यामुळे सोमवारी दुपारी ३ वाजता अप्पर वर्धा धरणाचे दोन गेट पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही दरवाजे त्याच रात्री ८ वाजता पुन्हा बंद करण्यात आले. पाच तास धरणातून विसर्ग झाला. हे पाणी वर्धा नदीने तिवसा तालुक्यातील जावरा गावातील नदीपात्रात बुधवारी सकाळी ९ वाजता पोहोचले. दुपारपर्यंत ते फत्तेपूर गावाच्या काही अंतरावर येऊन थांबले.
गुरुवारपासून टँकर
ज्या ठिकाणी नदीत तिवसा, गुरुदेवनगर, भारवाडीची पाणीपुरवठा योजना आहे, त्या ठिकाणी पाणी पोहोचणे कठीण आहे. कारण या पाण्याला जास्त प्रवाह नाही. ते ठिकाण अद्याप सहा किमी अंतरावर आहे. मात्र, जावरा नदीपात्रात चार फूट पाणी जमा झाले. यामुळे जनावरांची पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटली आहे. गुरुवारी सकाळपासून तिवसा शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी राजकारण चुकीचे आहे. तालुक्यातील नागरिकांना नियमितपणे पाणीपुरवठा करणे प्रशासनाचे काम आहे. अप्पर वर्धा धरणात जलसाठा उपलब्ध असताना अडवणूक केली. आता आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा

शहराला पाणीपुरवठा करणारी वर्धा नदी आटल्याने अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडणे गरजेचे होते. आ. ठाकूर यांनी पाण्याचा मुद्दे रेटून धरल्याने या आंदोलनाला यश आले. आता गुरुवारपासून तिवसा येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- वैभव वानखडे, नगराध्यक्ष

आमदार यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाचे फलित म्हणून प्रकल्पाचे पाणी आले. पाणीटंचाईच्या भागात आता टँकरने पाणीपुरवठा होईल. जनतेचा आंदोलनात सक्रिय सहभाग होता.
- पांडुरंग मक्रमपुरे, सरपंच, गुरुदेवनगर


Web Title: Water of Upper Wardha dam in Tivasa taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.