फोटो पी १६ एकझिरा
चिखलदरा : उन्हाळ्याची चाहूल लागताच मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. यंदाचा पहिला टँकर तालुक्यातील चिखलदरा तालुक्यातील एकझिरा गावात ११ मार्चपासून सुरू झाला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील ३० पेक्षा अधिक गावांत भीषण टंचाईची शक्यता वर्तविली जात आहे
जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होतो. डोंगरदऱ्यांतील उंच-सखल भागात वसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हातपंप आणि विहिरीच्या पाण्याची पातळी खालावते. दुसरीकडे नदी-नालेसुद्धा कोरडे पडू लागत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. गतवर्षी ३० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. यंदा त्यापेक्षा गंभीर होण्याची शक्य वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे.
बॉक्स
हातपंपाावर १५० गावांची मदार
चिखलदरा तालुक्यात १५० पेक्षा अधिक गावांत ३७१ हातपंप आहेत. पैकी १७ हातपंप निकामी झाले असून, ३५४ चालू स्थितीत असल्याची सरकारी नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक हातपंप पाण्याची पातळी खोल गेल्याने कोरडे पडू लागल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यासाठी एकच दुरुस्ती पथक असल्याने दीडशेपेक्षा अधिक गावांत पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागते. टँकरचा प्रस्ताव येताच प्रशासनाने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी आदिवासींची मागणी आहे.