मजीप्राच्या ग्राहकांचा आक्रोश, पालिकेकडे कोट्यवधींची थकबाकी
वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव शहरातील गुलजारपुरा, ढोरपुरा भागातील जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांनी पाण्याच्या मुद्द्यावरून एल्गार पुकारला आहे. पालिकेकडे मजीप्राची कोट्यवधींची थकबवाकी असल्याने शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
अंजनगाव सुर्जी व दर्यापूर शहरासह या दोन्ही तालुक्यांतील गावे व अकोट आणि भातकुली तालुक्यांतील काही गावे असा एकूण २३५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहानूर पाणीपुरवठा योजनेचे जलव्यवस्थापन अंजनगाव व सुर्जी या जुळ्या शहरात वाढत्या थकबाकीमुळे कोलमडले आहे. स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुली करा, अन्यथा पगार नाही, अशी तंबी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली गेली. तेव्हा थकबाकीदार ग्राहकांनी पाणी देयक भरण्याची मानसिकता ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मजीप्राकडून करण्यात येत आहे.
अंजनगाव सुर्जी शहरात एकूण ९ हजार ३५२ नळ ग्राहक आहेत. त्यात ९२५० घरगुती, १२७ व्यावसायिक व ७५ संस्थांचा समावेश आहे. शहानुर पाणीपुरवठा योजनेतून एक दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा ग्राहकांना केला जातो. उन्हाळ्यात संपूर्ण राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत होत असताना अंजनगाव शहरात मात्र शहानुर धरण नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहे. काही भागात मुबलक नसले तरी आवश्यक पाणी सर्व ग्राहकांना मिळते. या योजनेचे जलव्यवस्थापन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केले जाते. अंजनगाव व सुर्जी या जुळ्या शहरात पाणी ग्राहकांच्या वाढत्या थकबाकीचा डोंगर मात्र कमी होण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस तो वाढतच आहे. या भागातील ग्राहकांकडे ३८ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक थकबाकी नगर पालिकेवर आहे. अनेक ग्राहक अवैध आहेत. ज्यावर मजीप्राचे लक्ष नाही. थकबाकीचा डोंगर ग्राहकांच्या माथी मारून मजीप्रा ग्राहकांच्या भावनांशी जीवघेणा खेळ खेळत असल्याची ओरड आहे. दोन दिवसांपुर्वी मजीप्राच्या ग्राहकांनी त्या भागातील नगरसेवकाच्या घरी जाऊन आक्रोश केला. त्यानंतर नगरसेवक शरद बालंगे, गजानन हुरपडे, सुनील माकोडे यांनी मध्यस्थी करून नळ सुरु करून घेतले.