पान २ ची बॉटम
गावागावांत कर वसुलीसाठी बक्षीस योजना : विरूळ रोंघे ग्रामपंचायतीने घेतला पहिल्यांदा पुढाकार
धामणगाव रेल्वे : आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पाणीपट्टी व घरपट्टी कर भरावा, या रिता आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी बक्षीस योजना सुरू केल्या आहेत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पहिल्यांदा विरूळ रोंघे ग्रामपंचायतीने फ्रीज, एलईडी टीव्ही यांसारख्या बक्षिसांची घोषणा केली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींची दीड कोटींवर विविध कर थकबाकी आहे. ग्रामपंचायतींनी बक्षीस योजना जाहीर केली, तर कर वसुलीला मोठा हातभार मिळेल, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी बक्षीस योजना जाहीर केली. पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे यांच्यासमवेत पुढाकर घेत विरूळ रोंघे येथील सरपंच रूपेश गुल्हाने, उपसरपंच गोपाल मांडूळकर, सचिव अतुल गडलिंग यांनी ही बक्षीस योजना जाहीर केली. मार्च महिन्याअखेर शंभर टक्के कर भरणाऱ्या ग्रामस्थांकरिता ही योजना राहणार आहे. फ्रीज, एलईडी टीव्ही, डेझर्ट कूलर, ड्रेसिंग टेबल, गॅस गिझर, स्टँड फॅन, मिक्सर, होम थिएटर, कूकर, प्रेस ही बक्षिसे आहेत. २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता संत भास्कर महाराज सभागृहात सोडत होणार आहे. जळगाव (मंगरूळ) ग्रामपंचायतीनेदेखील अशीच बक्षीस योजना हाती घेतली आहे.
कोट १
विरूळ रोंघे ग्रामपंचायतने राबविलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने करवसुली व पाणीपट्टी वसुलीबाबत जनजागृती अभियान राबवावे. अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास गावाचा सर्वांगीण विकास होईल. गावकरी स्वत:हून कर भरायला समोर येतील. हा विषय प्रकाशझोतात आणल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार.
रामेश्वर ना. सरोदे, जळगाव (मंगरूळ)