अन्यथा ठिय्या आंदोलन : मानधनावरील शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्याचांदूरबाजार : नगर पालिका प्रशासनाच्या अख्त्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत. वारंवार सूचना देऊनही जिल्हा निवड समितीने या पदावर शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मानधन तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला होता. अद्यापही मानधन तत्त्वावर शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. यासाठी मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून पालिका उपाध्यक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या शाळेतील शिक्षकांची पदे कायमस्वरूपी भरलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता दरवर्षी मानधन तत्त्वावर शिक्षक नियुक्त करणे क्रमप्राप्त होते. परंतु नगरपालिका व्यवस्थापन मंडळाने ठराव घेऊन व वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही या महत्वपूर्ण बाबीकडे मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी गांभीर्याने लक्ष घातले नसल्याचा आरोप पालिका उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी केला आहे. शाळेचे सत्र सुरु होऊन तीन आठवडे पूर्ण होत आले असूनही शिक्षकांच्या नियुक्त्या न झाल्याने मानधनावरील शिक्षक नियुक्ती प्रकरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. आठवडाभराच्या आत मानधनावरील शिक्षकांच्या नियुक्त्या न झाल्यास पालिका उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी विद्यार्थ्यांसह मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत नगरपालिकेच्या अख्त्यारित विज्ञान व कला शाखेची मराठी-उर्दू उच्च माध्यमिक विद्यालये, माध्यमिक विद्यालये, तसेच प्राथमिक शाळा आहेत. यासर्व शाळामधून शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत. यात उच्च माध्यमिक विभागातील विज्ञान व कला शाखेची उर्दूसह आठ पदे रिक्त असून मराठीची ४ व उर्दू विभागाची ४ पदे रिक्त आहेत. तसेच प्राथमिक शाळांमध्ये एकूण ४४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचा विचार करून शिक्षकांच्या रिक्त जागा मानधन तत्त्वावर त्वरीत भरणे गरजेचे आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षक उपलब्ध करुन देऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून गेल्या काही वर्षापासून नगरपालिका प्रशासनाने या रिक्त जागांवर मानधनावर तात्पुरत्या स्वरुपाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या वर्षीही अशा नियुक्त्या होणे क्रमप्राप्त होते. विद्यार्थ्यांच्या हिताकरिता हा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी यात रोडा टाकल्याचा आरोप पालिका उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी केला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने मानधनावर शिक्षकांच्या नियुक्त्या न केल्यास आठवडयानंतर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा हुसैन यांनी दिला असून या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)यात विद्यार्थ्यांचा काय दोष?नवीन शालेय सत्र सुरू होऊन पंधरवडा लोटला आहे. मात्र, येथील पालिकेच्या शाळांमध्ये मानधन तत्त्वावर शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाहीत. दरवर्षीच कंत्राटी शिक्षकांची भरती केली जात असताना यंदा काय अडचण आली? हा प्रश्नच आहे. शिक्षकांची पदे कायमस्वरूपी भरणे तर सोडाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मानधन तत्त्वावरही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात न आल्याने शैक्षणिक नुकसान होण्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांचा या सगळ्या घडामोडींमध्ये काय दोष? असा सवाल पालकवर्गाने उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
मुख्याधिकाऱ्याविरूध्द उपाध्यक्षांचा एल्गार
By admin | Updated: July 17, 2015 00:21 IST