दोघांनी अनुभवला मृत्यूचा थरार, कशीबशी करून घेतली सुटका
मोर्शी : काळ आला पण वेळ आली नव्हती, ही म्हण मोर्शीकरांनी गुरुवारी पहाटे ५ वाजता अनुभवली. अप्पर वर्धातील विसर्गामुळे खळाळून वाहत असलेल्या वर्धा नदीवरील पुलाबाहेर कारची दोन चाके गेली होती. या घटनेत दोन युवकांनी कशीबशी स्वत:ची मृत्यूच्याच दाढेतून सुटका करून घेतली.
प्राप्त माहितीनुसार, नितीन महल्ले (रा. नागपूर) व योगेश वानखडे (रा. मोर्शी) हे दोघे रात्री मोर्शी येथून नागपूरला जाण्यासाठी निघाले होते. अप्पर वर्धा धरणाच्या पुलावर कार (एमएच ३० - ३६८२) ने आष्टीमार्गे मोर्शीकडे त्याच पुलावरून येणाऱ्या गाडीला साईड दिली. मात्र, कारची पुढील दोन चाके पुलावरून अधांतरी पिलरमध्ये असलेल्या सळाखीला अडकली व कार थांबली. सिनेस्टाईल अडकलेल्या कारमधून हे दोन्ही युवक कसेबसे बाहेर पडले. मोर्शी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय लेव्हलकर यांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत हे युवक त्यांच्या नातेवाईकांकडे मोर्शीला परतले. सिंभोरा येथील पोलीस पाटील शरद उमरकर यांनी पुढाकार घेऊन सकाळी जेसीबीने कार रस्त्यावर आणण्यात आली. यावेळी सहा दारांमधून ६० सेंटिमीटरने पाण्याचा विसर्ग होत असल्याने अप्पर वर्धा धरण दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कुठल्याही चुकीने अपघातात या युवकांची प्राणाशी गाठ होती. चार दिवसापूर्वी शिरसगाव येथील पर्यटक फोटो काढण्याच्या नादात पुलावरून नदीपात्रात पडून वाहून गेला होता.