पान २ फोटो वरूड
वरूड : तालुक्यातील वघाळ येथून एका बोकडासह तीन बकऱ्या चोरून नेल्याच्या प्रकरणात बेनोडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून चारचाकी वाहनासह बकऱ्या असा एकूण २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली, तर दोन आरोपी पसार झाले.
नाजीम खान मुस्तफा खान (२५) व अजहर अफसर खान पठाण (२३, दोघेही रा. वघाळ ) अशी अटक आरोपींची नावे आहेत, तर बंटी ऊर्फ सौरभ मनोज नंदेश्वर (२३), अशफाक अन्सारी अनिस अन्सारी (२३, रा. नागपूर) हे पसार झाले.
वघाळ येथून किशोर विठ्ठलराव पोहणे यांच्या गोठ्यातून १० जानेवारीला एक बकरी, बोकड आणि पिलू अशी तीन जनावरे अज्ञात लोकांनी चोरून नेली, तर याच गावातील यादव इंगळे यांची एक बकरी अशा एकूण ३८ हजार रुपयांच्या बकऱ्या चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली. बेनोडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणेदार मिलिंद सरकटे, उपनिरीक्षक पुपुलवार, जमादार सुभाष शिरभाते, शशिकांत पोहरे, संतोष औंधकर, विवेक घोरमाडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. दोन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या माहितीवरून आणखी दोन आरोपी निष्पन्न केले. अटकेतील आरोपींनी चोरीची कबुली दिली तसेच शिरजगाव कसबा येथे दाखल गुन्ह्यातील एमएच २३ वाय १३८२ क्रमांकाच्या वाहनाच्या चोरीची कबुली दिली. ते वाहन नागपूर येथून जप्त करण्यात आले. आरोपींनी नागपूर जिल्ह्यातील जलालखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच ३५ के ५६० हे चारचाकी वाहन चोरल्याचीही कबुली दिली. पसार आरोपींचा शोध बेनोडा पोलीस घेत असून, आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
---------------------