मोर्शी : स्थानिक शेतकरी घेत असलेल्या बागायती पिके, फळे, भाजीपाला विक्रीकरिता कोरोना लॉकडाऊनमध्ये बाजार समितीच्या माध्यमातून विक्रीस परवानगी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी केली.
मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी, नेरपिंगळाईसह तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला जोड म्हणून एका वर्षात तीन पिके घेण्याचे नियोजन केले आहे.
उन्हाळ्याच्या मोसमात भाजीपालासोबतच, एरवी नदी पात्रात घेतल्या जाणाऱ्या टरबूज, खरबूजची लागवड स्वतःच्या शेतात करून उत्पन्नवाढीचे प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि फळविक्रीची दुकाने आणि बाजार समितीसुद्धा बंद ठेवण्यात आली. पर्यायाने शेतातील भाजीपाल्याची तोड थांबली. विशिष्ट कालावधीत तोड करून ती बाजारात विक्रीस आणल्यास शेतकऱ्यांना भाव मिळतो, शिवाय शेतातील झाडांवर पुन्हा फळ धरले जाते.
शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नियोजनसुद्धा उन्हाळी पिकावर अवलंबून असते. मात्र, सध्या कठोर लॉकडाऊनमुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाला, टरबूज, खरबूज तसेच पडून आहेत. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या प्रवर्गात भाजीपाला, स्थानिक उत्पादित टरबूज, खरबूजसारख्या फळांचा समावेश करून जिल्हाधिकाऱ्यांनी विक्रीकरिता बाजार समिती उपलब्ध करून द्यावी, फळ, भाजीपाला विक्रेत्यांना गल्लीत गाडीवर विक्रीस परवानगी देऊन शेतकऱ्याचे हित जोपासावे, अशी मागणी करण्यात आली आहे.