अमरावती : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिनित्त २ जानेवारीपासून शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. २ ते ८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद वाढविणे, त्यांनी तत्काळ प्रतिसाद देणे, महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना प्राध्यान्य देणे आदी उद्दिष्टे पोलीस विभागाचे आहेत. २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शहरातून पोलीस मित्र रॅली काढण्यात येणार आहे. इर्विन चौक येथून चित्रा चौक, टांगा पडाव, गांधी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौकमार्गे वंसत हॉल येथे रॅलीचा समारोप होणार आहे. त्याठिकाणी चांगल्या कामगिरीबाबत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ पोलीस मित्रांना बक्षीस वितरित केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता पोलीस प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार असून त्यामध्ये पोलीस विभागातील शस्त्र प्रदर्शनी, श्वान पथकाची कामगिरी, बॉम्ब शोधक व नाशक पथकाची कामगिरी, आर्थिक घोटाळ्याची माहिती, सायबर गुन्हे, वाहतूक व्यवस्थापन व नियमन इत्यादी कामाकाजाबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच २ ते ८ जानेवारीदरम्यान शहरातील प्रमुख चौकात पोलीस बॅन्डचे प्रदर्शन करण्यात येईल. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थी पोलीस ठाण्यांना भेटी देणार असून त्यांना पोलीस कामकाजाबाबत माहिती देण्यात येणार आहे. या विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वर्धापन दिनानिमित्त पोलीस विभागाकडून शहरात विविध कार्यक्रम
By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST