सचिन सुंदरकर अमरावतीनववर्षात खगोलीय घटनांची मोठ्या प्रमाणात उलथापालथ होणार असून गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह पृथ्वीजवळ येणार आहेत. अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे. २०१५ या वर्षात अनेक खगोलीय घटनांची रेलचेल असेल. ४ जानेवारी रोजी पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर कमीत कमी राहील. या घटनेला खगोलशास्त्रात 'पेरेहेलीआॅन' असे म्हणतात. या दिवशी पृथ्वी, सूर्य हे अंतर १४७ दशलक्ष कि.मी. राहील.८ जानेवारीला सायंकाळी पूर्व क्षितिजावर चंद्राजवळ गुरू ग्रह दिसेल. १० जानेवारीला सायंकाळी पश्चिम क्षितिजावर शुक्राशेजारी बुध ग्रह दिसणार आहे.६ फेब्रुवारी रोजी गुरू-सूर्य प्रतियुती आहे. या दिवशी पृथ्वीपासून गुरूचे अंतर कमीत कमी राहील. टेलीस्कोपमधून गुरूचे चंद्र पाहता येईल. २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर चंद्रकोरीजवळ मंगळ व शुक्र दिसेल. २० मार्च रोजी खग्रास सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण ग्रीनलॅन्ड व सायबेरीयामधून दिसेल. २२ मार्च रोजी दिवस व रात्र समान राहील. ४ एप्रिल रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसेल. २३ मे रोजी शनी-सूर्य प्रतियुती आहे. या दिवशी शनी पृथ्वीच्याजवळ राहील. टेलीस्कोपमधून शनीची सुंदर रिंग पाहता येईल. ही रिंग साध्या डोळ्यांनी दिसणार नाही. २१ जून रोजी दिवस मोठा राहील. हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असेल. ६ जुलै रोजी प्लुटो-सूर्य प्रतियुती राहील व पृथ्वी-सूर्य हे अंतर अधिकाधिक राहील. १ सप्टेंबर रोजी सूर्य-नेपच्यून प्रतियुती आहे. या दिवशी नेपच्यून पृथ्वीच्या जवळ राहील. १३ सप्टेंबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. २३ सप्टेंबर रोजी दिवस व रात्र सारखी राहील. २८ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. आपल्याकडे चंद्र मावळताना ग्रहण स्पर्श दिसेल. १२ आॅक्टोबर रोजी सूर्य-युरेनस प्रतियुती आहे. हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. या दिवशी युरेनस हा पृथ्वीच्या जवळ राहील. १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या काळात सिंह राशीतून उल्का वर्षाव होईल. १३ ते १७ डिसेंबर या काळात मिथुन राशीतून उल्का वर्षाव होईल. २१ डिसेंबर रोजी चंद्र-पृथ्वी हे अंतर कमी राहील. २२ डिसेंबरचा दिवस हा सर्वात लहान राहील. हा दिवस १० तास ४७ मिनिटांचा राहील.
नववर्षात खगोलीय घटनांची उलथापालथ
By admin | Updated: December 13, 2014 00:45 IST