कंत्राटदाराच्या मर्जीने कामे : बांधकाम विभागाचे कामाकडे दुर्लक्षपापळ : पापळ हे गाव डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जन्मभूमी असल्याने शासनाने या गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. या गावाकरिता १५ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामार्फत अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. काही कामे संथगतीने अद्यापही सुरू आहेत. विविध विकास कामांकरिता निधी मिळाला. पण सा. बां. विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामांना दर्जा मिळविण्यात कुचराई केली जात असल्याचे आरोप होत आहे. बरीच कामे दर्जाहीन झाल्याचे नमुने पहावयास मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या कामापैकी पापळ बसस्थानक परिसरातील चौपदरीकरणाचे काम, नाली काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होताना दिसत असून या कामावर सा. बां. विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर दिसत नाही. या कामामधील अडथळा असलेले विद्युत पोल (खांब) अद्यापही हटविण्यात आले नाही. मात्र हे पोल प्रथमत: हटवून हे काम सुरू करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता पोल मधात ठेवूनच रस्त्याचे काम सुरू केले आहे. याबाबत माजी सरपंच सुनील देशमुख यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून विचारले असता पोल काढले नसले तरी ते काम बरोबर होते, अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. तसेच प्रवेशद्वार, सादिलखाना, ग्रामपंचायतजवळील हॉलचे कामेसुद्धा निकृष्ट होताना दिसत आहे. कामावर पाणीसुद्धा टाकले जात नाही. साहित्य निकृष्ट दर्जाचा वापरत आहे. सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामावर हजर राहून सुरू असलेल्या कामाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पापळ येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांची बैठक बोलावून जनतेचे म्हणणे, समस्या जाणून घ्यावा अशी पापळ येथील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
पापळ विकास आराखड्यांतर्गत कामांचा दर्जा खालावला
By admin | Updated: May 23, 2015 00:41 IST