आनंदराव अडसूळ यांचे प्रतिपादन : सांसद आदर्श गाव योजनेचा घेतला आढावाअमरावती : लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. आदर्श गाव योजनेअंतर्गत यावली (शहीद) हे गाव निवडण्यात आले असून त्यामध्ये कोणते विकास काम प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांसद आदर्श गाव योजनेचे महत्त्वाचे सात घटक असून त्यामध्ये वैयक्तिक विकास, मानव विकास, सामाजिक विकास, मूलभूत सूविधा स्वच्छ प्रशासन आदींचा समावेश आहे. यावेळी यावली (शहीद) ला असलेल्या ऐतिहासिक परंपरेमुळे आपण या गावाला प्राधान्य देत असल्याचे खासदार अडसूळ यांनी सांगितले. प्रामुख्याने गावातील पाणंद रस्ते, नाल्यांचे खोलीकरण, शुद्ध पाण्याचा पुरवठा, शहीद स्मारकाजवळील अपुरा रस्ता, खासदार निधीतून शाळांना संगणक, शौचालय, व्यायाम शाळेत सुसज्ज साधने याविषयी अडसूळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या योजनेअंतर्गत पाच वर्षांत पाचपेक्षा जास्त गावे आदर्श निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आदर्श गाव योजनेचा आढावा घेण्यात येईल व कालबद्ध पण गतीमान असा हा कार्यक्रम राबविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
समन्वयाने आदर्श गाव योजना राबवावी
By admin | Updated: November 16, 2014 22:43 IST