येवदा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली व तीन ब्रास रेती असा एकूण १० लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने विहिगाव येथे ८ मार्च रोजी ही कारवाई केली. याप्रकरणी मंगेश श्रीकृष्ण प्रजापती (३०) व शेख अयूब शेख युसूफ (३०, दोघेही रा. विहिगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांना रहिमापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेचे पथक रहिमापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असता, विहिगाव येथून चोरटी रेती वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरून नाकाबंदी करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक आशिष चौधरी, संतोष मुंदाने, पुरुषोत्तम यादव, रवींद्र बावने, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, चालक प्रमोद सरोदे यांनी केली.
---------------