- गजानन मोहोड/अमरावतीविभागातील बुलडाणा जिल्ह्यात १४२० गावांमध्ये झालेल्या पाणीपुरवठा योजनेत किमान दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे. यावर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी वाशिम जिल्ह्यातील अभियंत्यांची पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली. समितीला गावे नेमून देऊन एक महिन्याच्या आत अहवाल मागितला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील किमान ७० टक्के पाणीपुरवठा योजना बंद आहेत. ज्या योजना सुरू आहेत, त्याद्वारे दोन-दोन आठवडे पाणी येत नाही. यामध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याने सीबीआय चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सोमवारी विभागीय आयुक्तांकडे केली. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी चौकशी समिती गठित केली. या योजनांसाठी संपादित विहिरींच्या जागेचे अधिकृत दानपत्रच नाही. या विहिरींना पाणी नसतानाही नळ योजनांची कामे करण्यात आली. पाच कोटींच्या आत योजनेची कामे होणार नाहीत, हे माहीत असतानाही अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने योजनेच्या निधीची उचल करून वाढीव निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला. तरीही कित्येक वर्षांपासूनची कामे अर्धवट आहेत. काही योजनांच्या कामांची चौकशीअंती जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात आली; मात्र एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोप समितीने केला आहे.जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात १४० गावांची योजना असताना पाणी ३० गावांहून पुढे सरकलेच नाही. सामुदायिक योजनांपैकी ९० टक्के योजना बंद स्वरूपातल्या असताना, त्यावर वाढीव निधी मागितला जात असल्याचा शासनअहवाल आहे. योजनांचे आॅडिट झालेले नाही. योजना अर्धवट असताना चुकीच्या पद्धतीने मोजमाप घेऊन संगनमताने निधी काढून घेतला. एकाच गावात तीन योजनांची कामे करण्यात आली; मात्र पाण्याचा थेंबही गावकºयांना मिळाला नसल्याचे समितीने नमूद केला आहे.वाशिम मधील अभियंता करणार बुलडाणा जिल्ह्याची चौकशीविभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांची तांत्रिक व लेखा तपासणी जिल्ह्याबाहेरील वाशिम जिल्ह्यातील अभियंते करणार आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता एस.व्ही. इथापे, कार्यकारी अभियंता ए.एम. खान, उपविभागीय अभियंता एन.एम. राठोड, कनिष्ठ भूवैज्ञनिक आर.जी. गवई व सहायक लेखाधिकारी एस.एस. देशमुख या पथकात आहेत. ते खामगाव तालुक्यातील सुटाळा, जळाका तेल्ही, शेगाव तालुक्यातील लासुरा, आळसाना, तरोडा, पारसूड, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे, बोराळा, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी व संग्रामपूर तालुक्यातील बावनविहीर व निपाणा येथील योजनांची चौकशी करणार आहेत.
पाणीपुरवठ्याच्या १४२० गावांमध्ये दोन हजार कोटींचा घोटाळा, चौकशी समिती गठित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 18:16 IST