२० हजारांची रोकड, घरगुती साहित्य जळून खाक
टाकरखेडा संभू : स्थानिक ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीत वास्तव्यात असलेल्या दोन कुटुंबांतील घरांना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अचानक आग लागली. दोन्ही घरांतील घरगुती साहित्य जळून खाक झाले तसेच या आगीत रुक्मा चव्हाण यांनी एका पेटीमध्ये ठेवलेले मजुरीचे २० हजार रुपये जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ सतर्कता बाळगत आग विझविली.
टाकरखेडा संभू येथे बस स्टँडच्या बाजूला असलेल्या ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याच्या क्वाटरमध्ये काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक रुक्मा चव्हाण यांच्या घराला आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील साहित्यासह धान्य जळून खाक झाले. शेजारी राहत असलेल्या त्यांच्या सासू मंजुळा चव्हाण यांच्या घरालादेखील झळ पोहोचली. त्यामुळे या दोन्ही घरांतील जीवनावश्यक घरगुती वस्तू जळून खाक झाल्या. रुक्मा चव्हाण या विधवा असून, त्यांना तीन छोट्या मुली आहेत. त्यांनी मोलमजुरी करून जमा केलेली २० हजार रुपयांची रक्कमदेखील या आगीत जळून खाक झाली. त्यांच्यापुढे घराला सावरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.