बड़नेरा : निर्दयतेने ३४ गोवंश वाहून नेणारा ट्रक महामार्ग पोलिसांनी लालखडी परिसरातून मंगळवार ताब्यात घेतला. यात तीन गोवंश मृतावस्थेत सापडले. नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले.
पोलीस सूत्रांनुसार, बडनेरा महामार्ग सुरक्षा पथक हे पेट्रोलिंग करीत असताना एका ट्रकमधून निर्दयतेने गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नांदगाव पेठ टोलनाक्याजवळ सी.जी. ०७ सी.बी. ०९७७ क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न असता, तो भरधाव पुढे निघाला. महामार्ग पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. लालखडी परिसरातील एका मैदानात चालक ट्रक सोडून पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक राजू रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षक अधिनियम प्राण्यांना निर्दयतेने वागविणे मोटार वाहन कायद्यात अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. जखमी गोवंशावर उपचार केले जात आहे. सदर ट्रक नागपूर हुन अमरावतीकडे येत होता. या कारवाईत जमादार अनिल निंघोट, सुधीर राऊत, मंगेश रौराळे, नितीन ठाकरे, प्रकाश सोनोने, दिनेश राठोडसह महामार्ग पोलीस व इतरही कर्मचारी सहभागी झाले होते.