धारणी : मध्यप्रदेशातील बडवानी येथून २१ टन जनावरांचे चामडे भरून नेणाऱ्या ट्रकला एपीएमसी नाक्यावर वास येत असल्याने पकडण्यात आले. पोलिसांनी ट्रक अडवून तपासणीकरिता पशु वैद्यकीय डॉक्टरांचा अभिप्राय मागितल्याने एकच खळबळ उडली आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी करीत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर (२१ टन) चामडे आले कुठून, असा सवाल निर्माण झाला आहे. बडवानी जि. खरगोन (म.प्र.) येथून कसरावद रोडवरून एका कॉलनीतून २१ टन जनावरांचे चामडे भरून ट्रक क्रमांक एमपी-०९-एचजी-१८०३ क्रमांकाचा १२ चाकी ट्रक काल दुपारी निघाला. त्या ट्रकने मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील भोकरवाडी व धारणी येथील वनविभागाच्या नाका पास करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकावर पोहचला. आज सकाळी ९ वाजता दरम्यान नाक्यावर हा ट्रक उभा असताना प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. दुर्गंधीवरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्यावरील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याविषयी सूचना दिली. याप्रकरणी पोलिसांनी पशू चिकित्सकांकडून तपासणी करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे पुढे पोलीस कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यप्रदेशात पूर्वीपासूनच गोवंश हत्या प्रतिबंध कायदा अमलात आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा यावर्षी हा कायदा अमलात आणला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात प्रतिबंध असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर चामड्याची वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार पाहण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी होती. ट्रकमध्ये असलेल्या चामड्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. याविषयी तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता एका जनावराची चामडी २ ते अडीच हजार रुपये आहे. त्यानुसार एकूण किंमत २० लाखांच्या घरात असल्याची चर्चा आहे.
जनावरांच्या २१ टन चामड्यासह ट्रक पकडला
By admin | Updated: August 26, 2016 23:54 IST