निर्णय : मेळघाटातील मुलांना फायदाअमरावती : मेळघाटातील आदिवासीबहुल भागासह १६ आदिवासी जिल्ह्यांतील दहा बोलीभाषा लिपीबध्द करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. आदिवासी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षक बोली भाषेचे धडे गिरवणार आहेत. यासाठी बोली भाषांमधील शब्दकोष तयार करण्यात आला आहे. आदिवासी बोली भाषेतील वाक्यांचे भाषांतर देवनागरीत करून खेळच खेळ आणि प्रौढांसाठी या दोन पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी अािण शिक्षकांमधील दरी कमी करण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांना या पुस्तकांतील धडे गिरवावे लागणार आहेत. आदिवासी भागातील पहिली व दुसरीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शिक्षण मिळाल्यास त्यांची आकलनशक्ती वाढीस लागेल. परिणामी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कमी होईल. या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने १० आदिवासी बोली भाषेतील संवाद कातकरी, नहाली, गोंडी, कोलाम, परधाम , कोरकू आणि मानवी बोली भाषांमध्ये बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या वाक्यांचा समावेश खेळच खेळ आणि ओढ्या काढी या दोन पुस्तिकांमध्ये करण्यात आला आहे. बोली भाषेतील वाक्यासमोर देवनागरी, भाषेतील वाक्य असणार आहेत. त्यामुळे बोली भाषेतील कोणत्या वाक्याचा अर्थ काय? हे शिक्षक व विद्यार्थ्यांना समजू शकणार आहे. (प्रतिनिधी)
आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार मातृभाषेत शिक्षण
By admin | Updated: November 14, 2015 00:39 IST