झाडावर होते करकोचा पक्षाचे घरटे : पर्यावरण प्रेमी नाराज
चांदूर बाजार : शहरातील पंचायत समिती चौकातील कडूनिंबाच्या झाडावर करकोचा पक्षाचे घरटे होते. हे झाड तोडू नये, यासाठी पर्यावरणप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने जोवर झाडावरील पक्ष्यांची पिले मोठी होत नाही तोवर झाड न कापण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या झाडालगतचा विद्युत खांब बदलण्याच्या नावावर व झाडावर पक्षी नसल्याची संधी साधत महावितरणने अखेर ते झाड कापले.
रस्ते विकास कार्यात अडथळा ठरणारे मोठमोठे वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जमीनदोस्त केले आहेत. शहरातील शिवतीर्थ चौकात रस्त्याच्या कडेला कडूनिंबाची अनेक झाडे आहेत. रस्ताचे रुंदीकरण सुरू असल्याने ही झाडे कापली जात आहेत. त्यापैकी एका उंच कडूनिंबाच्या झाडावर दुर्मिळ होत चाललेल्या पांढऱ्या मानेचा करकोचा या पक्ष्याचे घरटे होते. त्या घरट्यात एक पिल्लू व सोबतच पक्ष्याने काही अंडी घातलेली होती. जर हे झाड कापले गेले तर पक्षी व पिल्ले बेघर होतील, ही बाब पर्यवरणप्रेमी व शिवप्रतिष्ठानचे शिवा काळे यांच्या लक्षात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या कडुनिंबाच्या झाडावरील करकोचा पक्ष्याचे घरट्यातील पिले वाचवण्याकरिता पक्ष्याचे पालकत्व स्वीकारून जोपर्यंत पिलं मोठी होऊन उडून जात नाही, तोपर्यंत सदर झाड न कापता रस्ता रुंदीकरणाचे उर्वरित काम जसे आहे तसे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. महावितरणतर्फे शहरातील वाकलेले विद्युत खांब बदलविण्याचे काम सुरू आहे. त्यादरम्यान त्या कडूनिंबाच्या झाडावरील घरट्यात करकोचा व त्याची पिल्ले नसल्याची बाब लक्षात घेऊन महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मजुरांकडून घरटी असलेले ते झाड कापले. यामुळे परिसरातील काही पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
-------------------------