फोटो मनपा अमरावती
लोकमत विशेष
अमरावती : राज्यातील १० ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या मंजूर एका पदाव्यतिरिक्त वाढीव एक पद निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली. बरहुकूम, या दहा महापालिकांना आता प्रत्येकी दोन अतिरिक्त आयुक्त मिळणार आहेत. या शासननिर्णयाची त्वरेने अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी महापालिका अधिकाऱ्यांमधून बुलंद झाली आहे. हा शासननिर्णय धडकताच महापालिका आस्थापनेवरील अधिकारी हर्षभरित झाले असून, ‘फिल्डिंग’ला सुरुवात झाली आहे.
मंजूर दोन पदांपैकी एक पद राज्य शासनाच्या सेवतील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरले जाणार आहे. उर्वरित एक पद महानगरपालिकेच्या उपायुक्तपदावरील अधिकारी तसेच तांत्रिक व लेखा सेवेतील समकक्ष अधिकाऱ्यांमधून निवडीने भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या उत्साहाला भरते आले आहे.
‘ड’ वर्ग महानगरपालिकांच्या लोकसंख्येत बरीच वाढ झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महानगरपालिकांवरील वाढलेला कामाचा ताण तसेच इतर प्रशासकीय बाबी हाताळण्यासाठी जास्त लोकसंख्या असलेल्या काही ‘ड’ वर्ग महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या एका मंजूर पदाव्यतिरिक्त वाढीव एक पद निर्माण करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण शासनाने नोंदविले.
दरम्यान, २०२१ च्या जनगनणेचे काम स्थगित करण्यात आले. सबब, सन २०११ च्या लोकसंख्येनुसार पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सोलापूर, मिरा भाईंदर, भिवंडी निजामपूर, अमरावती, नांदेड वाघाळा, कोेल्हापूर, अकोला, पनवेल, उल्हासनगर व सांगली या दहा ‘ड’ वर्गीय महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांचे मंजूर एका पदाव्यतिरिक्त वाढीव एक पद निर्माण करण्यास शासनाने ३० जून रोजी मान्यता दिली आहे.
बॉक्स
महापालिकेत वाढणार प्रशासकीय चुरस
नव्याने निर्माण करण्यात आलेले अतिरिक्त आयुक्तांचे पद नगरविकास विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार संबंधित महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकाऱ्यांमधून निवडीने भरण्यात येतील. ते अधिकारी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरीलच अधिकारी असतील.
बॉक्स २
अमरावतीला मिळणार का?
चार वर्षांपूर्वी सोमनाथ शेटे यांच्या रूपाने अमरावती महापालिकेला अतिरिक्त आयुक्त लाभले होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. त्यांना परत पाठविण्याचा प्रस्तावदेखील आला होता. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली. स्थापनेनंतर केवळ २०१६-१७ हे उणेपुरे एक-दीड वर्ष अमरावती पालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळाले. त्यामुळे नगरविकास विभागाने अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे दिली, महापालिका भरेल तेव्हा भरेल, शासनाने किमान प्रतिनियुक्तीचा अधिकारी देऊन आयुक्तांचा भार कमी करावा, अशी अपेक्षा प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.