दिन विशेष
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : दहा दिवसांचा गणपती विसर्जनाचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूच्या पूजेला अधिक महत्त्व असून चांगल्या प्रकारची फुले, फळे धान्य यांची पूजा घराघरात केली जाते.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करून अनंताचे व्रत करतात. विष्णूसहस्त्र नामावली वाचून एक हजार एक तुळशीपत्र वाहून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. अनंत हे एका महानागाचे नाव असले तरी ते नाव जपणे पुण्यकारक मानले जाते. या अनंत चतुर्दशी या दिवशी प्रत्येक वस्तू ही चौदा प्रकारची असते. फुले, फळे, धान्य यांचा नैवद्य दाखवून अनंताची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीची कथा ही सर्वसाधारणपणे सत्यनारायण पूजेच्या कथेला मिळतीजुळती असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत फार प्राचीन असल्याचे धर्मशास्त्रात पाहायला मिळते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. पांडवांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा श्रीकृष्णाने उपदेश केला होता,अशी यामागील दंतकथा आहे.
अनंत चतुर्दशीचे महत्त्व म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात होते. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाचा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत मूर्तीचे विसर्जन करतात. दुसरीकडे या जल्लोशात अनंत चतुर्दशी या अनंताच्या व्रताचा दिवस उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीपासून सुरू झालेल्या सणांचे पहिले पर्व अनंत चतुर्थीच्या दिवशी संपते. दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्ष शुभकार्यास वर्ज्य मानला जातो. त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये नवरात्रापासून दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, दत्त जयंती, होळी असे सण येतात.