अमरावती : राज्यात केवळ सहा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. विदर्भात वाघांची वाढलेली संख्या बघता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी दोन व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती हाेणे काळाची गरज आहे. मात्र, याबाबत वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाही. विदर्भात वाघांसाठी कॅरिडॉर तयार करणेचे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर आणि ताडोबा हे पाच विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात चार व्याघ्र प्रकल्प हे १९७५ पासून निर्माण करण्यात आले आहेत. विदर्भात वाघांची संख्या ४५०च्या घरात पाेहोचली आहे. यापैकी १०० च्या आसपास वाघ हे व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर वास्तव्यास दिसून येतात. परिणामी वाघ आणि मनुष्य हा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत आतापर्यंत १२ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. विदर्भात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपुरातून १५ वाघ हे गुजरात राज्यात पाठविले जाणार होते. मात्र, यास पुढे गती मिळाली नाही. वनविभाग याबाबत सकारात्मक नव्हता, हे विशेष.
"नवीन व्याघ्र प्रकल्प निर्मितीबाबत शासनाचे असे काही धाेरण नाही. मात्र, वाघांच्या वास्तव्यास सुरक्षिततेसाठी कॅरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातून वाघ स्थलांतर करताना तो सुरक्षित असेल."- आदर्श रेड्डी, वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प