लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वाघाचा नेमका आहार किती ? यावर तेलंगणापासून तर महाराष्ट्रापर्यंत वन अधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू आहे. या विषयाच्या अनुषंगाने मोबाइलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपवर हे वनाधिकारी व्यक्त होत आहेत. आपला अनुभव ते एकमेकांशी शेअर करीत आहेत.
नर वाघाला एका दिवसाला ८ ते १२ किलो मांस तर मादीला ६ ते १० किलो मांस लागते. एकाच वेळी मोठी शिकार मिळाल्यास ३०-३५ किलो मांस वाघाला उपलब्ध होते. एका दिवसाला १० किलो मांस विचारात घेतले तर त्याला महिन्याला ३०० किलो आणि वर्षांला ३६०० किलो मांस लागते.
भूक भागवण्यासाठी वाघ सांबर, नीलगाय, रानगवा, अस्वल, चितळ, जंगली डुक्कर, चौशिंगा, माकड, ससा, मोर या मोठ्चा, मध्यम व लहान प्राण्यांची शिकार करतो. कधीकधी पाळीव गुरांचीही शिकार करतो. वर्षाला त्याला ५० ते ६० मोठे प्राणी लागतात. वाघाचा रोजचा आहार १२ किलो मांस असला तरी वाघ दररोज शिकार करीत नाही. आठवड्यातून एकदाच तो शिकार करतो. तीन ते चार दिवस तो ती शिकार खातो. यानंतर पुढील दोन ते तीन दिवस तो काहीही खात नाही. यादरम्यान तो उपाशी राहतो, उपवास करतो, अशी त्याची दिनचर्यादेखील असते. यावर समाज माध्यमात चर्चा मोठ्या प्रमाणात झडत आहे.
वाघाच्या शिकारीबाबत अनेक प्रश्न अनुत्तरितव्याघ्र प्रकल्प क्षेत्राअंतर्गत वाघांच्या भूमीवर वाघांचे वास्तव्य असले तरी त्यांचा गृहीत धरलेला आहार, आहाराच्या अनुषंगाने त्या त्या क्षेत्रात तेवढे प्राणी उपलब्ध आहेत का? प्राणी उपलब्ध असतील तर वाध पाळीव जनावरांची शिकार का करतो? हे प्रश्नही कायम आहे.