दर्यापूर : तालुक्यातील खुर्माबाद येथून थ्रेशरचे साहित्य चोरणारे टोळके दर्यापूर पोलिसांनी अकोट तालुक्यातून जेरबंद केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, तर एक जण पसार झाला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, हर्षल सुनील मुरुमकार (२४), चंद्रकांत बाबूराव इंगळे (२७, दोन्ही रा. खुर्माबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा ३३ वर्षीय साथीदार पसार झाला आहे. खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्माबाद येथीलराजेश पुंडलिकराव गोंडचोर यांनी ८ मार्च रोजी शेतातून थ्रेशरचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी भादंविचे कलम ३७९ अन्वये खल्लार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते. थ्रेशरचे साहित्य हर्षल मुरुमकार याने चोरल्याची माहिती २० मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेला कळली. हर्षल हा सध्या बोरी (ता. अकोट) येथे गव्हाची काढणी करीत होता. या माहितीवरून बोरी येथून हर्षलला ताब्यात घेऊन त्याला चोरीबाबत विचारणा करण्यात आली. त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने खुर्माबाद येथील थ्रेशरचे साहित्य चंद्रकांत इंगळे व अन्य एकाच्या साहाय्याने चोरल्याची कबुली दिली. हर्षलच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ५,६९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यानंतर हर्षल व चंद्रकांत यांच्यासह संपूर्ण मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरिता खल्लार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पथकातील संतोष मुंदाने, रवींद्र बावणे, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, पुरुषोत्तम यादव, मंगेश लकडे, सायबर सेलमधील रीतेश वानखडे व चालक संदीप नेहारे यांनी ही कारवाई केली.
पान तीनसाठी