लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरणास सुरुवात झाली असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील ५९ पैकी सध्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे २ हजार ७२९ हजारांवर ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली.लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे राहू नये तसेच गर्दी होऊ नये, यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आदेश शासनाने व जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार नवीन लसीकरण केंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध तालुक्यांतील आरोग्य केंद्रांमध्ये सुरू केली आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गत आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. १५ मार्च रोजी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांत २ हजार ७२९ जेष्ठ नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.
१५ मार्च रोजीचे पीएचसीनिहाय लसीकरणधामणगाव गढी ५०, पथ्रोट १२३, येसूर्णा ५४, वलगाव ९३, सातेगाव ३८, आसरा ४९, खोलापूर ५२, गणोरी ६७, ब्राम्हणवाडा थडी ४१, करजगाव ५०, तळवेल ४०, शिरजगाव कसबा ६०, आमला विश्वेश्वर ९४, पळसखेड ३९, घुईखेड ६०, चंद्रपूर ३२, रामतीर्थ ७६, येवदा ११८, अंजनसिंगी १०२, मंगरूळ दस्तगीर १५६, निंबोली ६४, तळेगाव दशासर ६४, अंबाडा ३५, हिवरखेड ४७, खेड ५४, नेरपिंगळाई ९६, विचोरी ४८, लोणी टाकळी ६४, मंगरूळ चव्हाळा ३७, पापळ ७४, मार्डी ५०, तळेगाव ठाकूर २५०, लोणी ९३, राजुरा बाजार २१५, शेंदूरजना घाट १०, चुरणी १०, हरिसाल १८, कलमखार ३४, साद्राबाडी ६२.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा जिल्ह्यातील ५९ पैकी ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करण्यात आली आहे. लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. आणखी केंद्रे वाढवू. सुरुवातीला प्रतिसाद कमी वाटत असला तरी यात वाढ होणार आहे, हे नक्की. लसीकरणासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज आहे.- डॉ. दिलीप रणमले जिल्हा आरोग्य अधिकारी