धामणगाव रेल्वेत पुन्हा तीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:20+5:30

शहरातील धवणेवाडी, आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी आणि नागपूर येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या २१ वर्षीय युवती १२ दिवसांच्या वैद्यकीय उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ती सावंगी मेघे येथील रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्यासोबत सावंगी मेघे येथेच दवाखान्यात असलेल्या दोन बहिणी व आईला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते.

Three more positives in Dhamangaon Railway | धामणगाव रेल्वेत पुन्हा तीन पॉझिटिव्ह

धामणगाव रेल्वेत पुन्हा तीन पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देआंबेडकरनगर हॉटस्पॉट : तीन जणांचे घेणार थ्रोट स्वॅब

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : शहरातील २१ वर्षीय युवती सोमवारी कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर सदर युवतीच्या आई व दोन बहिणींचा अहवाल मंगळवारी उशिरा रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे धवणेवाडी, आंबेडकरनगर हा परिसर नवीन हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे.
शहरातील धवणेवाडी, आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी आणि नागपूर येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या २१ वर्षीय युवती १२ दिवसांच्या वैद्यकीय उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ती सावंगी मेघे येथील रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्यासोबत सावंगी मेघे येथेच दवाखान्यात असलेल्या दोन बहिणी व आईला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला, तर वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती वर्धा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.
सदर युवतीचे काका, काकू व चुलतभाऊ यांना परसोडी रस्त्यावरील कोविड सेंटरमध्ये आयसोलेशन करण्यात आले. थ्रोट स्वॅब घेण्यासाठी त्यांना अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणी केंद्रात नेले असून, तेथे क्वारंटाइन केल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी सांगितले. सदर युवतीची आई शहरातील तीन घरी घरकाम करीत असे. या तिन्ही कुटुंबांचे गृह विलगीकरण केले आहे. धवणेवाडी परिसर हे शहरातील भाजीपाला विक्रीचे केंद्र आहेत. याशिवाय येथून अनेक वाटा शहरातील वस्त्यांमध्ये जात असल्याने शुक्रवारपर्यंत घोषित जनता कर्फ्यूदरम्यान या परिसरातून ये-जा करण्यास निर्बंध घालण्यात आला.
दरम्यान, जळगाव आर्वी येथे मुंबईहून आलेल्या पारधी बांधवांच्या आरोग्याची काळजी आरोग्य प्रशासन घेत आहे. ज्या एकाच कुटुंबातील चार सदस्य कोरोना बाधित आहे, ते कुटुंब ३ मेपासून धामणगाव शहरात नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे तहसील प्रशासनाने कळविले आहे.

शहरातील इतर कोणत्याही भागात कोरोना संशयित रुग्ण नाहीत. शहरवासीयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- भगवान कांबळे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे

Web Title: Three more positives in Dhamangaon Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.