आॅटोरिक्षा चालकाची माणुसकीअमरावती : आईच्या शोधार्थ शनिवारी रात्री ९ वाजताच्यादरम्यान रस्त्यावर भटकणाऱ्या दोन मुलींना आॅटोरिक्षा चालकाने दाखविलेल्या मानवतेमुळे चाईल्ड लाईनच्या सहकार्याने रात्रभर बालसुधारगृहात आश्रय मिळाला. या मुलींना रविवारी सकाळी मुलींच्या शोधात कासावीस झालेल्या माता-पित्यांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान राजापेठ ते समर्थ हायस्कूल मार्गावर खुशी उमेश बनसोड ही चार वर्षिय चिमुरडी कडेवर दीड वर्षांच्या दीक्षा नामक बहिणीला घेऊन भरकटताना आॅटोरिक्षाचालक रवी बागडे (रा.इंदिराबाई झोपडपट्टी) यांच्या निदर्शनास आली. त्यांनी जागरूकता दाखवून मुलींना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. खुशीने स्वत:चे नाव सांगितले. आणि आपण आईच्या शोधात राजापेठपर्यंत आल्याची माहिती दिली. खुशीने सांगितलेल्या तोडक्या-मोडक्या पत्त्याच्या आधारे आॅटोचालक रवी याने खुशी व दीक्षा यांना आॅटारिक्षामध्ये बसवून त्यांच्या घराचा शोध घेतला. परंतु योग्य पत्ता नसल्याने घर सापडले नाही. अखेर आॅटोरिक्षा चालकाने कृष्णार्पण कॉलनी चौकात थांबून काही मित्रांची मदत घेण्याचे ठरविले. ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी चाईल्ड लाईनचे अजय देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. राजापेठ पोलीस ठाण्यालादेखील याबाबत माहिती देण्यात आली. दोन्ही मुलींना राजापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तेथून त्यांची गाडगेनगर परिसरातील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. आॅटोरिक्षाचालकाच्या जागरूकतेमुळे या दोन्ही मुलींसमवेत रात्रीदरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नाही.
‘त्या’ दोन चिमुकल्यांनी रात्र काढली बालसुधारगृहात
By admin | Updated: October 26, 2014 22:32 IST