नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील तळेगाव दाभेरी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका महिलेच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन गावगुंडांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुधीर रघुपती वानखडे व विनोद तुकाराम वानखडे, अशी आरोपींची नावे असून त्यांनी खुनाची कबुली दिली. याप्रकरणात ७ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या नीलेश गोविंद मेश्राम याच्या कबुलीजबाबानंतर या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तेच मुख्य आरोपी असल्याची माहिती शिरखेड पोलिसांनी दिली.
५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास मोर्शी तालुक्यातील तळेगाव ते विचोरी मार्गावरील एका शेतात ४० वर्षीय महिलेचा मृतदेह चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत व पार्श्वभागात काड्या खुपसलेल्या स्थितीत आढळून आला. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या महिलेची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तर, नीलेश गोविंद मेश्राम (रा. मनिमपूर, ह.मु. तळेगाव) याला अटकदेखील केली. त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी अधिकृत प्रेसनोट काढून प्रसिध्दीस दिले होते. मात्र, पोलीस कोठडीदरम्यान, नीलेश मेश्रामने वेगळाच घटनाक्रम सांगितला. सुधीर रघुपती वानखडे व विनोद तुकाराम वानखडे यांनी त्या महिलेचा खून केला. मात्र, जिवाच्या भीतीने आपण तो आळ स्वत:वर घेतल्याची कबुली दिली होती. दोन्ही आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने आपण आधी खोटे बोललो, असे मेश्रामने सांगितले. त्याच्या माहितीवरून दोघांनाही अटक करण्यात आली.
चार दिवस बलात्कार
१ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडलेली संबंधित महिला चार दिवस आरोपींच्या ताब्यात होती. त्या चार दिवसांत तिचेवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. वाच्यता केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही ती ऐकायला तयार नसल्याने आपण तिचा खून केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली. ओळख पटू नये, म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचला, असेही आरोपींनी कबुल केल्याची माहिती शिरखेड पोलिसांनी दिली.
-------------
बॉक्स
माफीचा साक्षीदार?
या प्रकरणात आधी अटक केलेला नीलेश मेश्राम हा प्रथमदर्शनी निर्दोष असल्याचे चौकशी व पोलीस कोठडीदरम्यान निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या भूमिकेविषयी न्यायालयाला अवगत करण्यात येईल, अशी माहिती शिरखेड पोलिसांनी दिली.
--------------------