४५ ‘चेकपॉईंट’वर कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:37+5:30

शहरात कुठल्याही कामानिमित्त दाखल होणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची पोलिसांनी सकाळपासूनच कसून चौकशी केली. दुपारी ३ चा ठोका वाजताच संचारबंदी तीव्र करण्यात आली. यानंतर मात्र रस्त्यावर एकाही नागरिकाला फिरण्यास मनाई होती. संचारबंदी लागू झाल्यानंतर एका दिवसातच नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता मास्क लावून रस्त्यावर उतरलेल्या हजारो पोलिसांनी मात्र आपल्या कर्तव्यात कुठलेही कसूर सोडले नाही.

A thorough inquiry at '45 checkpoint' | ४५ ‘चेकपॉईंट’वर कसून चौकशी

४५ ‘चेकपॉईंट’वर कसून चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्तालय हद्दीत प्रत्येक वाहनावर ‘वॉच’ : संचारबंदीची नागरिकांनी घेतली धास्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोव्हेल कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता शासन व प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, संपूर्ण जिल्हा ‘लॉक डाऊन’ झाला आहे. सोमवारी सायंकाळपासूनच संचारबंदी (कर्फ्यू) लागू झाल्याने मंगळवारी अत्यावश्यक सुविधांसंदर्भातील शिथिलता वगळता १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाचे चौक, गर्दीच्या ठिकाणांवर एकूण ४५ ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले होते.
शहरात कुठल्याही कामानिमित्त दाखल होणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची पोलिसांनी सकाळपासूनच कसून चौकशी केली. दुपारी ३ चा ठोका वाजताच संचारबंदी तीव्र करण्यात आली. यानंतर मात्र रस्त्यावर एकाही नागरिकाला फिरण्यास मनाई होती. संचारबंदी लागू झाल्यानंतर एका दिवसातच नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता मास्क लावून रस्त्यावर उतरलेल्या हजारो पोलिसांनी मात्र आपल्या कर्तव्यात कुठलेही कसूर सोडले नाही.
कोरोना विषाणूचा प्रसार देशात व राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहता, त्यास प्रतिबंध व्हावा, या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये पारित करण्यात आलेल्या कलम १४४ अनुषंगाने शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जनतेला संचार न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेची ठिकाण वगळून इतर ठिकाणी नागरिकांचा संचार होवू नये, याकरिता शासनाच्या निर्देशाप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सोमवारी रात्रीच सर्व पोलीस ठाण्यांच्या मोबाइल व्हॅनद्वारे व स्वत: ठाणेदारांनी आपल्या हद्दीत गस्त घालून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या व संचारबंदी घोषित झाल्याच्या सूचना दिल्या. अत्यावश्यक सुुविधांकरिता मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत यातून शिथीलता देण्यात आली होती. पण, अत्यावश्यक सुविधांकरिताच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. याव्यतिरिक्त बाहेर पडलात, तर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सुधारित आदेशान्वये बुधवारपासून सकाळी ८ ते १२ या वेळेत फक्त नागरिकांना अत्यावश्यक सुविधेसाठी बाहेर पडता येणार आहे. यामध्ये दूध, धान्य, किराणा, भाजीपाला, फळे यांची विक्री व खरदी करीता शिथिलता देण्यात आली. मंगळवारी शहरात ८०० पोलीस कर्मचारी, १५० पोलीस अधिकाºयांचा फिक्स पॉइंट व गस्तीवर बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये स्वत: पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरात फिरून संचारबंदीचा आढावा घेतला. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव तसेच संबंधित एसीपींचा शहरावर वॉच होता. पंचवटी, चौक, राजकमल चौक, वलगाव ठाण्याजवळ, गोपालनगर, चित्रा चौक तसेच शहरातील मुख्य चौकात पोलिसांनी नाकेबंदी पॉइंट ठेवले होते.

गर्दी टाळण्याकरिता प्रयत्न
संचारबंदीमध्ये ज्यावेळी शिथिलता देण्यात आली होती, त्यावेळी फळ, भाजीपाला, किराणा दुकाने यामध्ये पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्रित येऊ नये, याचीही खबरदारी पोेलिसांनी घेतली होती. त्यामुळे नागरिकांनी भीतीच्या वातावरणातच बाहेर पडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. अनेक खासगी डॉक्टरांनीही कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता ओपीडी बंद ठेवली होती.

Web Title: A thorough inquiry at '45 checkpoint'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.