...तर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 04:41 PM2021-10-08T16:41:59+5:302021-10-08T17:05:43+5:30

अमरावतीत एका कथित प्रियकराने तरुणीला लग्न कर नाहीतर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर, तरुणीचा बदनामीकारक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

... then I will commit suicide by writing a letter in your name! | ...तर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन!

...तर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन!

googlenewsNext
ठळक मुद्देएकतर्फी प्रेमातून तरुणीची बदनामी : इन्स्टाग्रामवर बदनामीकारक छायाचित्र अपलोड

अमरावती : माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा तुला जीवे मारणार नाही, पण मी आत्महत्या करेन, अन् तुझ्या नावाने चिठ्ठीदेखील लिहून ठेवेन, अशी धमकी एका प्रियकराने त्याच्या कथित प्रेयसीला दिली. अखेर त्याला गजाआड करण्यात आले. विशाल रमेश सोळंके (२५, रा. वलगाव) असे त्या प्रियकराचे नाव आहे.

४ ऑक्टोबर रोजी आरोपीने तक्रारकर्त्या तरुणीचा बदनामीकारक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. याबाबत तरुणीच्या मैत्रिणींनी तिला माहिती दिल्यानंतर तिने खातरजमा केली. इन्स्टाग्रामवरील ‘त्या’ आक्षेपार्ह छायाचित्रामुळे ती मानसिकरीत्या दबावात आली. अखेर तिने आईवडिलांसह ५ ऑक्टोबर रोजी रात्री गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल सोळंकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चंदापुरे या पुढील तपास करीत आहेत.

असे घडले प्रकरण

पीडिता व आरोपीची सन २०१७ पासून ओळख होती. स्कूलबस प्रवासादरम्यान ओळख होऊन त्यांच्यात प्रेमदेखील फुलले. दोघांनी एकत्र फोटोदेखील काढले. व्हॉट्सॲप चॅटदेखील सुरू झाले. आरोपी हा वारंवार 'तसले' फोटो पाठव, म्हणून तिच्यावर दबाव आणत होता. या प्रकाराने पिडीता त्रस्त होती.  

ऑक्टोबर २०२० मध्ये आरोपीने तिला रस्त्यात अडविले. त्यावेळी तुझ्यासोबत संबंध ठेवायचे नाही, असे म्हणून तिने त्याला झिडकारले. त्यामुळे त्याने दोघांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकले. त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग सुरुच ठेवला. दरम्यान, २० सप्टेंबर २०२१ रोजी ती कमलपुष्प कॉलनी ते गणेशदास राठी विद्यालयाजवळून जात असताना त्याने तिला रस्त्यात अडविले व लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी दिली.

‘एफबी’वर फेक अकाउंट

समाजमाध्यमावर फोटो अपलोड करून एका महिलेची बदनामी केल्याचा अन्य एक प्रकार अमरावती शहरात घडला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी एका यूआरएलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीने एका महिलेच्या नावावर खोटे फेसबुक अकाउंट बनविले. त्यावरून त्या महिलेसह तिच्या मैत्रिणींना, बहिणीला व काही ग्रामस्थांना अश्लील मॅसेज पाठविले. १६ सप्टेंबर रोजी घडलेल्या त्या प्रकारामुळे आपली बदनामी झाली, अशी तक्रार त्या महिलेने नोंदविली. अज्ञाताविरुद्ध विनयभंग, बदनामी व आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: ... then I will commit suicide by writing a letter in your name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.