विटांचीही चोरी : नागरिकांची पोलिसात तक्रार, शासनाचे दुर्लक्षदर्यापूर : स्थानिक तहसील कार्यालयाजवळील जुन्या शवविच्छेदन केंद्रातील सागवान लाकडे अनेक दिवसांपासून अज्ञात भामटे टप्प्याटप्प्याने चोरून नेत आहेत. ते ऐवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी भग्न अवस्थेत असलेल्या या शवविच्छेदन केंद्रातील विटा व अनेक पडीत साहित्य लंपास केले आहे. पण येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात पोलिसांकडेही तक्रार केली. पाच ते सात वर्षापूर्वी अमरावती रस्त्यावरील नवीन तहसील कार्यालयानजीक असलेले शवविच्छेदन केंद्रात मृतकाचे शवविच्छेदन करण्यात येत होते. परंतु कालांतराने हे केंद्र येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात आल्यामुळे अनेक वर्षांपासून हे केंद्र भग्नावस्थेत आहे. परंतु ज्या जागी अनेक वर्ष शवविच्छेदने करण्यात आली व जेथे सामान्य माणूस चुकूनही फिरकत नाही तेथे परिसरातील चोरांनी जणू डेरा टाकला आहे. या केंद्राभोवती असलेले हजारो रुपयांचे सागाचे लाकडे व बांधण्यात आलेला ओटा व भिंत तोडून विटा व इतर साहित्य लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय इमारत व इतर पडीत इमारतींवर लक्ष व देखभाल करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजगुरे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भाचे पोलिसांनाही कळविले आहे. (प्रतिनिधी)
दर्यापुरातील जुन्या शवविच्छेदन केंद्रातील सागवान लाकडांची चोरी
By admin | Updated: March 4, 2015 00:30 IST