अमरावती : कमी पैशात सोन्याच्या गिन्न्या देण्याची बतावणी करून एका महिलेकडील ३ लाख रुपये घेऊन पळ काढणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्यासोबत त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. १८ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मण देविदास जाधव (वय ६२ वर्षे, रा. सोमठाणा ह.मु. कारंजा जि. वाशिम) असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. तर त्याच्यासोबतच, कैलास भाऊराव जाधव (वय ३८ वर्षे, रा. सावंगी ता. दारव्हा जि. यवतमाळ) यालादेखील अटक करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील सारखनी येेथील पद्मिनी नामक ४५ वर्षीय महिलेला कमी पैशाच्या मोबदल्यात सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. १७ जून रोजी त्यांना त्यासाठी आरोपी दीपक पल्हाडे (रा. गोंडवडसा ता. किनवट जि. नांदेड) याने नांदगाव खंडेश्वर हद्दीतील एका ठिकाणी बोलावले होते. त्या आल्या असता त्यांना सोन्याच्या बनावट गिन्न्या दाखवून मारहाण करण्यात आली होती. पल्लाडे व त्याचे अन्य साथीदार पद्मिनी यांच्याकडील ३ लाख रुपये जबरीने घेऊन चारचाकी वाहनाने पळून गेले होते. त्याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.