बेदखल : १७० गावातील नागरिकांना घ्यावा लागतो हॉटेलचा आश्रय
धारणी : मेळघाटची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या धारणी शहरात जिल्हास्तरावरील जवळपास सर्वच शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांपैकी तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयात जनतेची मोठ्या प्रमाणात ये-जा असते.
शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी या कार्यालयांमध्ये लोकांना दररोज सकाळी १० पासून सायंकाळी ६ पर्यंत ताटकळत बसावे लागते. अशावेळी लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून धारणी ग्रामपंचायतीमार्फत तहसील व पंचायत समिती कार्यालयात पाण्याची टाकी उभारली गेली. सुरुवातीचे पहिले वर्ष कसेबसे या टाकीमध्ये पाणी उपलब्ध करण्यात आले, मात्र पाच-सहा वर्षांपासून या पाण्याच्या टाकीत थेंबभर पाणीसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात विविध गावांतून येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी जवळपासच्या हॉटेलवर पैसे खर्च करून पाणी प्यावे लागत आहे.
धारणी मुख्यालयात जवळपास १७० गावांतील नागरिक हजारोंच्या संख्येने दररोज तहसील व पंचायत समिती कार्यालयात विविध कामांसाठी येतात. नगरपंचायत प्रशासनाने तसेच तहसील व पंचायत समिती कार्यालयाने तातडीने त्यांच्याकरिता तहसील व पंचायत समिती या दोन महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.