अंबानगरीचे वैभव : आमदारांनीही दिले महापालिकेला पत्र अमरावती : अंबानगरीचे वैभव असलेल्या श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे जतन करण्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य (ताऊ) यांनी पुढाकार घेतला आहे. खापर्डे वाड्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आ. रवी राणा यांनीही महानगरपालिकेला पत्र दिले आहे. ख्यातनाम वकील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा पुरातन वाडा खापर्डेंच्या दुसऱ्या पिढीने एका बिल्डरला विकला. हा ऐतिहासिक वाडा अंबानगरीचे वैभव असल्याने पुण्यातील शनिवार वाड्याप्रमाणे याचेही जतन होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या वाड्याला अनेक क्रांतिकारकांनी व देशभक्तांनी भेटी दिल्यात. येथूनच स्वातंत्र्याच्या अनेक चळवळीदेखील उदयास आल्यात. लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, वि.दा. सावरकर, अरविंद घोष, अॅनी बेझंट, डॉ.राजेंद्र प्रसाद, डॉ.केशवराव हेडगेवार, डब्ल्यू. सी.बॅनर्जी, भगिनी निवेदिता, हैदराबादचे प्रसिध्द जहांगीरदार राजा, मुरली मनोहर व त्यांचे चिरंजीव राजा इंद्रकरण आदी देशभक्तांनी व थोर पुरुषांनी या वाड्याला भेटी दिल्या होत्या.इतकेच नव्हे, तर तर शेगावीचे योगी श्रीसंत गजानन महाराज, संत गुलाबराव महाराज, संत नारायण महाराज, अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचे हंसस्वरुप स्वामी, कीर्तनकार हरदास फलटणकर आदींचा आशीर्वाद व सहवास या वाड्याला लाभला आहे. म्हणूनच ऐतिहासिक ठेवा म्हणून या वाड्याचे जतन करण्याकरिता महापालिकेने हा वाडा आरक्षित करावा, (लॅन्ड याकवार) यासाठी गजानन भक्तांचे एक शिष्टमंडळ व शहरातील जागरूक नागरिकांनी श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य (ताऊ) यांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. ताऊंनी या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. आ. रवी राणा यांनीही महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली असून तसे पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाला गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)वाड्याला लाभला ‘श्रीं’चा सहवासशेगावीचा राणा श्रीसंत गजानन महाराज यांनी काही काळ या वाड्यात विश्रांती केली होती. येथील विहिरीला व औदुंबराच्या झाडाला संत गजानन महाराजांचा पदस्पर्श लाभला आहे. त्याकाळी गजानन बाबा औदुंबराच्या ओट्यावर येऊन बसले असता प्रथमत: श्रीमंत दादासाहेबांनी त्यांना 'महाराज' संबोधल्याची इतिहासात नोंद आहे. ‘श्रीं’नी वाड्याला भेट दिल्याचा उल्लेख दासगणू महाराजांच्या पोथीमध्येदेखील आढळतो. ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे जतन होणे गरजेचे आहे. त्याकरिता सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन महानगरपालिकेत ठराव पास करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ व त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग लाभणार आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. - प्रभाकरराव वैद्य,प्रधान सचिव,श्री हव्याप्र मंडळ, अमरावती.
खापर्डे वाड्याच्या जतनासाठी ‘ताऊं’नी घेतला पुढाकार
By admin | Updated: September 30, 2015 00:34 IST