फोटो पी २९ वरूड
वरूड : कोरोना संक्रमणकाळात काही रुग्णवाहिकाचालकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची लूट चालविल्याच्या तक्रारींची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे दर निश्चित केले. मात्र, त्यानंतरही काही जण अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याने तहसीलदारांनी येथील रुग्णवाहिकांवर चक्क दरपत्रकच चिकटवले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा नेमका आदेश काय, रग्णवाहिकेचे दर काय, याबाबत सामान्यांना इतरांना विचारण्याची गरज राहिलेली नाही.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन लागू असताना, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलम १८८ अन्वये कारवाईचे आदेश आहेत. या आदेशाचे पालन करीत महसूल आणि पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणारे, विनामास्क असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. रुग्णवाहिकेच्या अतिरिक्त दरामुळे रुग्णांचे नातेवाईक हैराण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित दर पत्रक लागू केले. त्याबाबत जनजागृतीकरिता प्रभारी तहसीलदार धबाले, ठाणेदार चौगावकर यांनी रुग्णवाहिकेच्या दर्शनी भागात शासकीय दरपत्रक लावले.
असे आहेत दर
० ते २५ किमीकरिता साधी मारुती व्हॅन ८०० रुपये, टाटा सुमो ९०० रुपये , टाटा ४०७ ला १२०० रुपये, आयसीयू सुविधा २ हजार रुपये असे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिले आहे. २५ किमीनंतर प्रतिकिमी १५ ते २५ रुपयांपर्यंत भाडे पडणार आहे. यामध्ये रुग्णवाहिकाचालकाने कसूर केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये आणि आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
सर्व समाविष्ट
सदर भाडेदरामध्ये चालकाचा आणि इंधनाचा खर्चसुद्धा समाविष्ट असल्याने अतिरिक्त पैसे आकारता येणार नाही, असेही परिपत्रकात नमूद केले आहे. याबाबत जनजागृती करण्याकरिता वरूड पोलीस विभाग आणि महसूल विभागाने प्रत्येक रुग्णवाहिकेवर दरपत्रकाचे स्टिकर दर्शनी भागात लावले. यावेळी प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले, ठाणेदार प्रदीप चौगावकर , पीएसआय कृष्णा साळुंके, वाहतूक सहायक उपनिरीक्षक अनिल माहुरे, नितीन गुर्जर, विशाल आजनकर, यशपाल राऊत, बबलू भोरवंशी, अमित करिया हे उपस्थित होते.